टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघेही गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करून फॉर्ममध्ये परतले आहेत.
स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, संयुक्त सचिव प्रभतेज सिंग भाटिया, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष मिथुन मनहास उपस्थित राहतील की नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ही बैठक सामन्याच्या दिवशी होणार असल्याने, विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना आमंत्रित केले जाण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
वृत्तात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, ही बैठक टीमच्या निवडीमध्ये सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे, तसंच टीमचा दीर्घकालीन विकास आणि कामगिरीबद्दल बैठकीत चर्चा होईल.
या बैठकीचा अजेंडा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये घरच्या मैदानात 2-0 ने झालेला पराभव असणार आहे. बैठकीत गंभीर आणि आगरकर दोघांच्याही उपस्थितीमुळे, बीसीसीआयला काही गोष्टींवर स्पष्टता हवी आहे, ज्यातून भविष्याच्या योजना आखता येतील.
'घरच्या टेस्ट सीरिजवेळी मैदानावर आणि मैदानाबाहेर गोंधळात टाकणारे अनेक डावपेच आखले गेले आहेत. आम्हाला याबद्दल स्पष्टता हवी आहे, ज्यातून भविष्याचं नियोजन करता येईल. पुढची टेस्ट सीरिज 8 महिन्यांनी आहे. पुढच्या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार आहे, त्यामुळे आम्हाला हे प्रश्न लवकर सोडवायचे आहेत', असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
विराटचा टेस्ट खेळायला नकार
विराट कोहली, रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात संवादाचा अभाव असल्याचं वृत्तही समोर आलं आहे. कोहलीने टेस्ट क्रिकेटमधील निवृत्ती मागे घ्यावी, अशी बीसीसीआयची इच्छा होती. रविवारच्या सामन्यानंतर विराटला याबाबत प्रश्नही विचारण्यात आला, पण त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करायला स्पष्टपणे नकार दिला आहे.
