माध्यमांशी बोलताना, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, भविष्यात ते उत्तर भारतातील हवामान लक्षात घेऊन सामन्यांचं आयोजन करण्याचा विचार करतील. लखनऊमधील टी-20 सामना रद्द झाल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत, याची कबुली राजीव शुक्ला यांनी दिली आहे. बीसीसीआय टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचा आढावा घेईल. 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान होणारे सामने उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात होतील, असंही राजीव शुक्ला म्हणाले.
advertisement
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर थंडी असते तसंच धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते, यात प्रदूषण हादेखील एक प्रमुख घटक आहे.
'धुक्यामुळे सामना रद्द करावा लागला. लोक खूप संतापले होते. 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीतील सामन्यांच्या वेळापत्रकाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात सामने हलवण्याबाबत चर्चा होईल. देशांतर्गत सामन्यांवरही धुक्याचा परिणाम झाला आहे; हा एक गंभीर मुद्दा आहे', अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली आहे.
तिकीटाचे पैसे परत मिळणार?
बीसीसीआयने टी-20 सीरिजच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष केले आणि परिणामी, लखनऊमधील चाहत्यांना टी-20 सामना पाहण्याची संधी मिळाली नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिकिटांवर हजारो रुपये खर्च करणाऱ्या चाहत्यांना त्यांचा पूर्ण परतावा मिळणार नाही. बुकिंग शुल्क वजा केल्यानंतरच त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील.
टीम इंडियाचंही नुकसान
लखनऊ टी-20 रद्द झाल्यामुळे केवळ चाहत्यांचंच नाही तर टीम इंडियाचेही नुकसान झाले. भारतीय टीम टी-20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर टीम इंडियाने लखनऊमध्ये सामना जिंकला असता तर त्यांनी तिथेच मालिकाही खिशात टाकली असती. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर सीरिज 2-2 ने बरोबरीत संपेल. पाचवा टी-20 सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे.
