कोणता निर्णय घेण्यात आला?
ठाणे शहरातील पादचारी पुलांसाठी महापालिकेला आठ वर्षांनी जाग आली असून आता या पुलांवर लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने या लिफ्टसाठी निधी गोळा करण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून पैसे उभारण्याचा मार्ग ठरवला आहे. महापालिकेने एका कंपनीला तब्बल 15 वर्षांसाठी या पुलांवरील जाहिरातीचे हक्क दिले आहेत. आठ वर्षांपूर्वी हे पादचारी पूल बांधण्यात आले होते परंतु त्या वेळी लिफ्टसाठी आर्थिक तरतूद का केली गेली नाही असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
advertisement
ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. महामार्गावरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी 2016-17 मध्ये कोपरी, खारेगाव, विवियाना मॉल आणि कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठासमवेत चार ठिकाणी पादचारी पूल तयार करण्यात आले होते. या पुलांवर पायऱ्या असल्या तरी काही नागरिकांसाठी त्यांचा वापर करणे कठीण ठरत होते. विशेषतहा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसाठी पायऱ्यांवरून चढणे कठीण असते. या नागरिकांसाठी लिफ्टची गरज अत्यंत महत्त्वाची आहे.
महापालिकेच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांना या पादचारी पूलांचा फायदा आठ वर्षांपर्यंत मिळू शकला नाही. जर लिफ्ट वेळेवर बसवली असती तर या पुलांचा उपयोग अधिक लोकांना सहजपणे होऊ शकला असता. आता प्रशासनाने जाहिरातीच्या माध्यमातून लिफ्ट बसवण्याचा खर्च वसूल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मुंबईतील ऊर्जा ब्युटिशियन अँड डेव्हलपर्स कंपनीला 15 वर्षांसाठी जाहिरात हक्क देऊन या निधीची व्यवस्था केली जाणार आहे.
या निर्णयामुळे शहरातील पादचारी वाहतूक अधिक सोपी आणि सुरक्षित होईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी पूलांचा उपयोग सोपा होणार आहे.
