ही गोष्ट ओडिशातल्या मयूरभंजच्या राजघराण्यातली आणि 100 वर्षांपूर्वीची आहे. राजघराणं जवळपास विखुरलं होतं. सत्ता दोन भागांत विभागली गेली होती. असं वाटलं होतं, की प्रेम हरलं; पण नशिबाने सगळं पालटलं. जे प्रेम निघून गेलं होतं ते पुन्हा मिळालं; पण त्या वेळी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलं होती.
राजा कोण आणि मुलगी कोण?
advertisement
ओडिशाच्या महाराजांचं नाव श्रीरामचंद्र भंज देव आणि त्यांचं प्रेम जिच्यावर जडलं होतं, त्या मुलीचं नाव सुचारू देवी असं होतं. या कथेत, विरोध, बंड, दुरावा, अश्रू आणि आनंदी पुनर्मीलन सगळं आहे. ही प्रेमकथा ओडिशातल्या भंज वंशाचे सर्वांत प्रसिद्ध राजे श्री रामचंद्र भंज देव यांची पत्रं, डायरींनी भरलेल्या ट्रंकमध्ये सापडली. त्यांच्या संपत्तीमध्ये सुचारू देवी नावाच्या बंगाली महिलेला लिहिलेल्या प्रेमपत्रांचाही समावेश होता.
ती मुलगी राजाला कुठे भेटली?
महाराजांना आधुनिक ओडिशाच्या निर्मात्यांपैकी एक मानलं जातं. ते एक तात्त्विक आणि दूरदर्शी राजे होते. 1889मध्ये श्रीरामचंद्र भंज देव राजा होण्याच्या तीन वर्षांआधी दार्जिलिंगला गेले होते. तिथल्या एका कार्यक्रमात त्यांना ती मुलगी भेटली. त्या वेळी ते 18 वर्षांचे आणि ती 15 वर्षांची होती. सुचारू 19व्या शतकातले बंगालचे ब्राह्मो समाजाचे समाजसुधारक केशवचंद्र सेन यांची कन्या होती.
श्रीरामचंद्र यांनी सुचारूशी लग्नाची पूर्ण तयारी केली. दोघं नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत होते; पण असं होणार नाही हे त्यांना माहिती नव्हतं. राजाने सुचारूशी लग्न करण्याबाबत घरी सांगितलं तेव्हा घरचे चकित झाले. त्या काळी हिंदू धर्मातल्या व्यक्तींनी ब्राह्मो समाजातल्या व्यक्तीशी लग्न करणं चांगलं मानलं जायचं नाही. हा एक प्रकारचा आंतरधर्मीय विवाह असायचा. राजघराण्यात याला एवढा विरोध झाला, की त्यांना निर्णय बदलावा लागला.
कुटुंबाच्या इच्छेनुसार राजाला करावं लागलं लग्न
यानंतर राजांनी सुचारूला माफीचं पत्र पाठवून नातं तोडलं. कौटुंबिक परंपरेनुसार, त्यांनी 1896मध्ये त्यांच्या वडिलांच्या संमतीने पोराहाट (आता बिहारमध्ये) इथल्या एका हिंदू राजपूत राजकन्येशी लग्न केलं आणि तिने दोन मुलगे व एका मुलीला जन्म दिला; पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. राजा बनलेल्या श्रीरामचंद्रांची राणी आणि मुलगी एका आजाराने मरण पावल्या.
प्रेम पुन्हा भेटलं
नंतर त्यांनी राज्याच्या विकासकामात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं. पत्नीच्या मृत्यूचं त्यांना दु:ख होते. ते एकदा कोलकात्याला गेले होते. तिथे एका पार्टीत त्यांची तब्बल 14 वर्षांनी पुन्हा सुचारूशी भेट झाली. सुचारूचं तोपर्यंत लग्न झालं नव्हतं. ती अजूनही राजावर प्रेम करत होती. त्या वेळी राजांनी ठरवलं की आता ते प्रेम आयुष्यातून जाऊ देणार नाही आणि त्यांनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
लग्नानंतर महाराज आणि राणी (facebook account)
पुन्हा झाला विरोध
राजाच्या लग्नाबद्दल कळताच घराण्यात पुन्हा विरोध झाला. घरातील लोक नाराज झाले; पण या वेळी त्यांनी लग्न करायचं ठरवलंच होतं. या जोडप्याने 1904मध्ये कोलकात्यात लग्न केलं. यानंतर त्यांनी राज्यात शाळा, रुग्णालयं बांधली आणि टाटांच्या सहकार्याने मयूरभंजमध्ये पहिली लोह आणि स्टील खाण बांधली.
सुचारू मुख्य महालात जाऊ शकत नव्हती
सुचारूपासून महाराजांना एक मुलगा आणि दोन मुली झाल्या; पण ते राणीला मयूरभंज पॅलेसमध्ये नेण्याचे धैर्य एकवटू शकले नाहीत. त्यांनी कोलकात्यात मयूरभंज रोडवर राणीसाठी राजाबाग पॅलेस बांधला. त्यांनी मयूरभंजमध्ये एक खास गेस्टहाउस बांधलं, जेणेकरून त्यांची पत्नी कधीही तिकडे आली तर ती तिथे राहू शकेल. कारण महाराजांचे आई-वडील जिवंत होते आणि त्यांनी राणी सुचारू हिला राजवाड्यात जायला बंदी घातली होती.
मयूरभंज यांचं शाही परिवार (courtesy – peepultree)
आनंद टिकू शकला नाही
सुचारू आणि महाराजांचा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाच्या आठ वर्षांनंतर राजा ब्रिटिश प्रतिनिधी आणि त्यांच्या भावजींसह शिकारीला गेले असातना रहस्यमयरीत्या गोळ्या घालण्यात आल्या. रुग्णालयात उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. सुचारू यांनी नंतरही अनेक चांगली कामं केली.
सुचारू यांनी काय केलं
1931मध्ये सुचारू बंगाल महिला शिक्षण लीगच्या अध्यक्षा होत्या. त्या अखिल बंगाल महिला संघाच्या अध्यक्षाही होत्या. कोलकात्यात त्या स्त्री-पुरुष समानतेच्या समर्थक होत्या. विरोधाचा सामना करूनही मयूरभंज राज्याची दिशा ठरवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. मजूरभंजला स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकसित केलं. पाणीपुरवठा नेटवर्क सुधारून आरोग्य सेवेवर काम केलं. सुचारू आणि श्रीराम यांचे पुत्र ध्रुबेंद्र भंज देव नंतर रॉयल एअर फोर्सचे फायटर पायलट बनले. दुसऱ्या महायुद्धात एका मोहिमेत त्यांचा मृत्यू झाला.