2021पासून सुरू झाला विभाजन विभीषिका स्मृती दिवस
फाळणीच्या दुःखद स्मृतींना उजाळा देणारा दिवस पाळायला 2021 पासून सुरुवात झाली. त्याला विभाजन विभीषिका स्मृती दिवस असं म्हटलं जातं. दुसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली होती. 14 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी काय घडलं होतं, त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
advertisement
10 मे 1857 ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा
देशात 10 मे 1857 पासून सुरू झालेल्या आणि 15 ऑगस्ट 1947 ला संपलेल्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं सर्वस्व बलिदान करणाऱ्या क्रांतिकारकांचं आणि स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्न साकार होत होते. एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे भारताच्या फाळणीच्या आणि रक्तपाताच्या घटनांमुळे लोकांची मनं दुखावत होती. पाकिस्तानातून ट्रेनमधून येणारे लुटले गेलेले हिंदू आणि शीख यांची गर्दी दिल्लीत वाढत होती, तणाव टिपेला पोहोचला होता आणि शांततेसाठी सरकारचे प्रयत्न अपयशी ठरत होते.
स्वातंत्र्याआधीची वेदनादायी फाळणी
ब्रिटिश संसदेत 4 जुलै 1947 रोजी सादर करण्यात आलेला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 वादानंतर 18 जुलै 1947 रोजी मंजूर करण्यात आला होता. याच आधारावर 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाली आणि कोट्यवधी लोकांना फाळणीचे भयंकर परिणाम भोगावे लागले. आकडेवारीनुसार, भारताच्या फाळणीदरम्यान हिंसाचारात सुमारे 10 लाख लोकांचे जीव गेले, तर 1.46 कोटी लोकांना बेघर व्हावं लागलं होतं. 50 हजारांहून अधिक महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.
फाळणीनंतर भारतातली भयंकर परिस्थिती
इतिहासकार ॲलन कॅम्पबेल-जोहान्सन यांनी भारताच्या फाळणीवर आपल्या लेखात लिहिलंय, की मानवी इतिहासातल्या धर्मावर आधारित सर्वांत मोठ्या विस्थापनात भारतातील दोन मोठी राज्यं अर्थात पंजाब आणि बंगालमधल्या 10 कोटी लोकांचे सामान्य जीवन उद्ध्वस्त झाले होते. स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी लिहिलेल्या या लेखात ॲलन कॅम्पबेल-जोहान्सन यांनी दोन लाख लोक निर्वासित होते असं सांगितलंय. त्यांची भयंकर परिस्थिती पाहून भीती वाटत होती की कॉलरा पसरून हजारो लोकांचे जीव जातील.
भारताच्या फाळणीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रक्रिया
इतिहासकारांच्या मते भारताच्या फाळणीची संपूर्ण पार्श्वभूमी 20 फेब्रुवारी 1947 रोजी तयार करण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये घोषणा केली होती, की त्यांचं सरकार 30 जून 1948 पूर्वी भारतीय नेत्यांकडे सत्ता सोपवेल. पण लॉर्ड माउंटबॅटन यांनी ही संपूर्ण प्रक्रिया मुदतीच्या एक वर्षाआधीच पूर्ण केली. माउंटबॅटन सत्ता हस्तांतरणाची मंजुरी घेऊन 31 मे 1947 रोजी लंडनहून नवी दिल्लीला परतले.
भारताचं स्वातंत्र्य व फाळणीवर एकमत
यानंतर 2 जून 1947 रोजी ऐतिहासिक बैठक झाली. यात भारताचं स्वातंत्र्य व फाळणी या दोन्ही मुद्द्यांवर जवळपास एकमत झालं. नंतर, 4 जून 1947 रोजी झालेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत माउंटबॅटन यांनी ब्रिटिश सरकारच्या ठरलेल्या तारखेच्या एक वर्षाआधी भारताची सत्ता भारतीय नेत्यांकडे सोपवण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेला सर्वांत मोठा प्रश्न भारताच्या फाळणीमुळे होणारं नागरिकांचं विस्थापन याबद्दल होता. त्याचं स्पष्ट उत्तर न देता माउंटबॅटन यांनी फाळणीसाठी 14 ऑगस्ट व स्वातंत्र्यासाठी 15 ही तारीख ठरवली. अचानक घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 18 जुलै रोजी ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मंजूर करावा लागला होता.
15 ऑगस्टच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताला स्वतंत्र राष्ट्र घोषित करून पाकिस्तानच्या निर्मितीची घोषणा का करावी लागली, याबाबत डॉमिनिक लॅपियर व लॅरी कॉलिन्स यांनी लिहिलेल्या 'फ्रीडम ॲट मिडनाईट' या पुस्तकाच्या 'आधी रात को आझादी' या हिंदी अनुवादामध्ये सविस्तर सांगितलंय. लॉर्ड माउंटबॅटन यांना ज्योतिषांच्या आग्रहासमोर झुकावं लागलं होतं, असं त्यात म्हटलंय.
माउंटबॅटन यांनी कर्मचाऱ्यांना दिली होती ताकीद
ज्योतिषांनी ग्रह-नक्षत्रांचा अभ्यास करून 14 ऑगस्ट हा 15 ऑगस्टपेक्षा जास्त शुभ दिवस असल्याचं म्हटलं होतं. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व ब्रिटनचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी आपले तरुण प्रेस सल्लागार ॲलन कॅम्पबेल-जोहान्सन यांना या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ज्योतिषांचा सल्ला घेण्याची जबाबदारी दिली होती. तसंच ब्रिटिश राजवट जाणवेल असं काहीच भारतीयांसमोर बोलायचं नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी हाताखालच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिली होती.
युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकवला होता तिरंगा
डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी 14 ऑगस्ट 1947 या ऐतिहासिक दिवसाचं चित्रण करताना त्यांच्या पुस्तकात लिहिलं, 'लष्करी छावण्या, सरकारी कार्यालयं, खासगी घरांवर फडकणारा युनियन जॅक खाली उतरवला जात होता. 14 ऑगस्ट रोजी सूर्यास्त झाला तेव्हा युनियन जॅक देशभरातल्या ध्वजस्तंभावरून उतरला होता. तो भारताचा भूतकाळ होता. मध्यरात्रीच्या समारंभासाठी सभा भवन सज्ज होतं, ज्या खोल्यांमध्ये भारताच्या व्हाइसरॉयची भव्य ऑइल पेंटिंग्ज टांगलेली असायची, तिथे आता तिरंगे फडकत होते.'
देशभरात होता स्वातंत्र्याचा आनंदोत्सव
त्यांनी पुढे लिहिलं, "14 ऑगस्ट 1947 च्या सकाळी देशातलं प्रत्येक शहर आणि गावात स्वातंत्र्याचा आनंदोत्सव सुरू झाला होता. लोक घरातून बाहेर पडून सायकली, रिक्षा, बैलगाड्या, बस, कार, घोडे, हत्ती जे मिळेल त्यावर स्वार होऊन इंडिया गेटकडे निघाले होते. लोक नाचत होते, गात होते, एकमेकांचं अभिनंदन करत होते आणि सगळीकडे राष्ट्रगीत ऐकू येत होतं."