Ratan Tata: रतन टाटांनी मध्यमवर्गीयांसाठी पाहिलं होतं स्वप्न, पण झाले फेल, चूकही केली मान्य!
- Published by:sachin Salve
Last Updated:
अपयशाला त्याचं चुकीचं मार्केटिंग जबाबदार असल्याचं रतन टाटांनी नॅनोच्या लाँचिंगनंतर काही वर्षांनी म्हटलं होतं.
मुंबई: भारताच्या उद्योगजगतातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे रतन टाटा. त्यांनी स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार करण्याबरोबरच देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान कसं उंचावेल, त्यांची स्वप्नं कशी पूर्ण होतील याचाही विचार केला. त्याचाच एक भाग होता तो म्हणजे टाटा नॅनो कार. रतन टाटांना नॅनो कार तयार करण्याची अनोखी कल्पना कशी सुचली याचं कारणही वेधक आहे.
काही वर्षांपूर्वी आलेली टाटा नॅनो कार ही सामान्यांच्या आवाक्यातली बजेट कार होती. अगदी एक लाखातही कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं हा विश्वास या कारच्या माध्यमातून रतन टाटांनी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केला. सर्वसामान्यांचं आयुष्य सोपं कसं करता येईल याबाबत रतन टाटा नेहमीच विचार करायचे. त्यातूनच नॅनो कारचा जन्म झाला. या कारबद्दल ती बाजारात येण्याआधीच सर्वांना कुतूहल होतं.
advertisement
टाटा नॅनो कार घडवण्यामागे मध्यमवर्गीय समाजाला आरामदायी अनुभव देण्याचा उद्देश होता. सर्वसामान्य भारतीयांना स्वस्त आणि सुरक्षित चारचाकी वाहन मिळावं, अशी योजना त्यांनी दोन हजारच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला तयार केली होती. त्यानंतर 2008 साली पहिल्यांदा नवी दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये नॅनो कार जगासमोर आली. मार्च 2009मध्ये गाडीचं अधिकृत लाँचिंग झालं.
advertisement
अशा पद्धतीची कार तयार करण्याची कल्पना कशी सुचली याबाबत रतन टाटांनी कारच्या लाँचिंगनंतर बऱ्याच काळानं इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी म्हटलं होतं, ‘बऱ्याच काळापासून मी भारतीय कुटुंबांना स्कूटरवर बसून फिरत असलेलं पाहत होतो. वडील स्कूटर चालवायचे, आई मागे बसायची आणि मध्ये मूल बसलेलं असायचं. निसरड्या, खड्ड्यांच्या रस्त्यांवरूनही ते स्कूटर चालवायचे. नॅनो कार अशा सर्वांसाठी होती. स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिकल्यामुळे फावल्या वेळात मी डूडल करायला लागलो. सगळ्यात आधी दुचाकी वाहनं अधिक सुरक्षित कशी करता येतील, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. तेव्हा डूडल चार पायाचं बनलं. त्याला खिडक्या नव्हत्या, दारंही नव्हती. एखाद्या ड्यून बग्गीसारखी ती रचना होती. मग अखेर ती कारच असावी असं मी ठरवलं.’
advertisement

टाटा नॅनो कार बाजारात आली; पण काहीच वर्षांत टाटांना ती बंदही करावी लागली. नॅनोच्या अपयशाला त्याचं चुकीचं मार्केटिंग जबाबदार असल्याचं रतन टाटांनी नॅनोच्या लाँचिंगनंतर काही वर्षांनी म्हटलं होतं. नॅनो कारचं डिझाइन करणाऱ्याचं साधारण वय 25-26 वर्षं इतकं होतं. एक लाख रुपयांमध्ये एक परवडणारी कार तयार करण्याचा हा प्रयत्न चांगला होता; मात्र आमच्याकडून एक मोठी चूक झाली. टाटा मोटर्सच्या सेल्सच्या माणसांकडून ती चूक झाली. सर्वांत स्वस्त कार म्हणून नॅनोचा प्रचार करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी परवडणारी कार असं जर तिचं ब्रँडिंग केलं असतं तर कदाचित नुकसान टळलं असतं, असं ते एका कार्य़क्रमात म्हणाले होते. काहीही असलं तरी सर्वसामान्यांना परवडेल अशी कार देण्याचं स्वप्न रतन टाटा यांनी नॅनो कारच्या निर्मितीद्वारे पूर्ण केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 9:40 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Ratan Tata: रतन टाटांनी मध्यमवर्गीयांसाठी पाहिलं होतं स्वप्न, पण झाले फेल, चूकही केली मान्य!