मोठेमोठे गार केले गंमतमध्ये... पक्षातील नेत्यानेच मंत्री शिरसाटांना डिवचलं, कारसमोरच राडा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उपमहापौरपदाच्या निवडीवरून जंजाळ आणि शिरसाट यांच्यात नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उपमहापौरपदाच्या निवडीवरून राजेंद्र जंजाळ आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील नाराजी नाट्याने पुढचे वळण घेतले आहे. राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनी संजय शिरसाट यांच्या गाडीसमोर मोठा जल्लोष करीत मोठमोठे गार केले गंमतमध्ये... अशा घोषणा देऊन त्यांना डिवचले. जंजाळ समर्थकांनी महापालिकेच्या मुख्य दरवाजावरून आतमध्ये घुसून महापालिकेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली तसेच गुलाल उधळत जल्लोष केला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाला ५६ जागा मिळाल्या. बहुमतासाठी केवळ एका नगरसेवकाची गरज असतानाही भाजपने शिवसेना पक्षाला युतीत सहभागी करून महापौरपद दिले. शिरसाट यांना उपमहापौरपद आपल्या गटातील माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याने शिरसाट यांचा नाईलाज झाला.
advertisement
मोठेमोठे गार केले गंमतमध्ये.... जंजाळ समर्थकांची प्रचंड घोषणाबाजी
त्यानंतर उपमहापौरपदाच्या निवडीवरून जंजाळ आणि शिरसाट यांच्यात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर जंजाळ समर्थकांकडून शिरसाट यांना वादग्रस्त बॅनर दाखविण्यात आले.
कमबॅक, मोठमोठे गार केले गंमतमध्ये... कुणाच्याही नादी लाग-आमच्या नादी लागू नको... महागात पडेल अशा आशयाचे बॅनर शिरसाट यांना दाखविण्यात आले.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कारसमोरच जंजाळ समर्थकांनी तुफान जल्लोष केला. महापालिकेच्या मुख्य दरवाजावरून आत घुसून तेथील आवारात जंजाळ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून गुलालाची उधळण केली.
advertisement
उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासून संजय शिरसाट यांना पक्षाने जाणुन बुजून दूर ठेवले
महापौरपदी समीर राजूकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची नावे जाहीर करताना पालकमंत्री संजय शिरसाट हे अनुपस्थित होते. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यग्र असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार बैठकीमध्ये जाहीर केले. संजय शिरसाट यांना जाणुनबुजून महापौरपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने दूर ठेवण्याचीही चर्चा आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला केवळ १३ जागा मिळाल्या. शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी हे मात्र निवडून आले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठेमोठे गार केले गंमतमध्ये... पक्षातील नेत्यानेच मंत्री शिरसाटांना डिवचलं, कारसमोरच राडा









