पारंपरिक शेतीला शोधला नवा पर्याय, वर्षाला 8 लाख रुपये उत्पन्न, शेतकऱ्यानं असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बीड जिल्ह्यातील गावंदरा येथील शेतकरी श्रीहरी बडे यांनी पारंपरिक शेतीला नवा पर्याय शोधत रेशीम शेतीच्या माध्यमातून मोठे आर्थिक यश मिळवले आहे. त्यांच्याकडे एकूण पाच एकर शेती असून त्यातील दोन एकर क्षेत्र त्यांनी रेशीम शेतीसाठी वापरले आहे.
शेतकरी सध्याला पारंपरिक शेतीला नवा पर्याय शोधत आहेत. बीड जिल्ह्यातील गावंदरा येथील शेतकरी श्रीहरी बडे यांनी पारंपरिक शेतीला नवा पर्याय शोधत रेशीम शेतीच्या माध्यमातून मोठे आर्थिक यश मिळवले आहे. त्यांच्याकडे एकूण पाच एकर शेती असून त्यातील दोन एकर क्षेत्र त्यांनी रेशीम शेतीसाठी वापरले आहे. याआधी या जमिनीत ते गहू, ज्वारी आणि सोयाबीन यासारखी पारंपरिक पिके घेत असतं. मात्र, त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय त्यांच्यासाठी आव्हानात्मक होता परंतु योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात चांगले यश मिळवले.
advertisement
रेशीम शेती सुरू करण्यासाठी श्रीहरी बडे यांना मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागली. रेशीम किडींसाठी आवश्यक शेड उभारणीसाठी जवळपास 4 लाख रुपयांचा खर्च आला. मात्र, शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेतल्याने त्यांचा आर्थिक भार कमी झाला. सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेड उभारले आणि दर्जेदार रेशीम उत्पादनाला सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कीड व्यवस्थापन आणि अन्ननिर्मिती यावर भर दिला.
advertisement
रेशीम शेतीच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी चांगला नफा मिळत आहे. सध्या त्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेतीतून त्यांना अधिक फायदा मिळतो आहे. बाजारपेठेतील मागणी आणि दर्जेदार रेशीम उत्पादनामुळे त्यांचे उत्पन्न सातत्याने वाढत आहे. नियमित व्यवस्थापन आणि मेहनतीमुळे त्यांनी कमी क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
श्रीहरी बडे यांनी सांगितले की, रेशीम शेती पारंपरिक शेतीपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते परंतु त्यासाठी योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनामुळे ते यशस्वी झाले. भविष्यात आणखी विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.
advertisement
रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी श्रीहरी बडे यांचा प्रवास एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. नवीन प्रयोग करण्याची तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्यास शेतकरी अधिक चांगले उत्पन्न मिळवू शकतात. श्रीहरी बडे यांची यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे ज्यामुळे अधिकाधिक शेतकरी आधुनिक शेती पद्धतीकडे वळण्यास प्रेरित होतील.