मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची चिन्हं हवामान विभागाने दाखवून दिली आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार 25 सप्टेंबर रोजी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हा पाऊस मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल. त्याचबरोबर वादळी वाऱ्याचीही शक्यता हवामान विभागाने नाकारलेली नाही. या अंदाजामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
advertisement
कोकण विभाग
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पालघर जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर, अहमदनगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या भागात आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून सरी कोसळतील.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. या भागातील शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकांना होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
विदर्भ
विदर्भातील अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
सध्या राज्यात कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके उभी आहेत. पावसामुळे या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
कापूस पिकासाठी : पांढरी माशी, थ्रिप्स आणि बोंडअळी नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड, थायमेथोक्साम किंवा अॅसिटामिप्रिड यासारख्या औषधांची शिफारस केली जाते. बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्यास स्पायनोसॅड किंवा फ्लुबेंडियामाईड यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
सोयाबीन पिकासाठी : अळी नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन यांसारखी औषधे वापरावीत. पानांवरील रोग (अॅन्थ्रॅक्नोज, पानांवरील डाग) रोखण्यासाठी कार्बेन्डाझिम किंवा मॅन्कोझेब यांसारखी बुरशीनाशके फवारावीत.
फवारणी करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाच्या आधी किंवा पाऊस थांबल्यानंतर फवारणी करणे आवश्यक आहे, अन्यथा औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.