नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीबाबत कृषीमंत्री भरणेंनी दिले महत्वाचे आदेश!
- Published by:Ajit Bhabad
- Reported by:SIDHARTH GODAM
Last Updated:
Agriculture News : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून संपूर्ण मदत दिली जाईल.अशी ग्वाही दिली.
जालना : राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून संपूर्ण मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
advertisement
ओल्या दुष्काळावर निर्णय कधी?
भरणे म्हणाले, राज्यात सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाला असून, यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. “ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठराविक निकष तपासणे आवश्यक असते. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्र सरकारसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
शेतकऱ्यांना दिलासा
कृषीमंत्र्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची जमीन घरडून गेली आहे किंवा ज्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना शासन तातडीची मदत करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठविण्याची गरज नाही. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी थेट शेतात जाऊन पंचनामे करतील.
advertisement
कर्जवसुली थांबविणार
मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की, ज्या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तिथे शेतकऱ्यांवर कर्जवसुली होणार नाही. राज्य सरकार याबाबत बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे.
निधीची तरतूद
शासनाने नुकतेच २,२१५ कोटी रुपये मदत निधी जमा केले असून, ही रक्कम हळूहळू वाढत आहे. या निधीतून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत वितरित केली जाईल. भरणे यांनी सांगितले की, “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कोणतीही मदत थांबणार नाही. शासन प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवेल.”
advertisement
शेतकऱ्यांना आश्वासन
कृषीमंत्र्यांनी सांगितले की, निसर्गाच्या या संकटात शेतकऱ्यांना शासन एकटे सोडणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसोबतच आवश्यक ते सर्व दिले जाईल. “शेतकऱ्यांसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे,” असे ते म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 8:47 AM IST