कुठे कोणता अलर्ट?
पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला गेला असून तेथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचा अंदाज असून पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर व सातारा घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हलका पाऊस होईल असा अंदाज आहे.
advertisement
मराठवाडा विभागातही पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता असून नाशिक घाटमाथ्यावर मात्र मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिक घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भ भागातही पावसाचे संकेत आहेत. अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलका पाऊस व अंशतः ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना कराव्यात.
सोयाबीन पिकासाठी
सततच्या पावसामुळे पाने पिवळी पडणे (यलोिंग) किंवा पाने गळणे हा त्रास वाढतो. यासाठी कार्बेन्डाझिम 50% WP (25 ग्रॅम / 10 लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब 75% WP (25 ग्रॅम / 10 लिटर पाणी) यापैकी एक औषध फवारावे. जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास पाण्याचा निचरा करावा.
कापूस पिकासाठी
पावसाच्या दिवसांत बोंड अळी (Pink Bollworm, Spotted Bollworm) आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढतो. यावर नियंत्रणासाठी स्पिनोसॅड 45% SC (3 मिली / 10 लिटर पाणी) किंवा क्लोरंट्रानिलिप्रोल 18.5% SC (3 मिली / 10 लिटर पाणी) फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी आणि हवामान कोरडे असेल तेव्हाच औषधांचा वापर करावा.