एका दिवसात दरात हजार रुपयांची झेप
केवळ एका दिवसात १,००० रुपयांची उसळी सोयाबीन दरात पाहायला मिळाली. ६ नोव्हेंबर रोजी बिजवाई सोयाबीनचा दर ७ हजार ४०१ रुपये प्रति क्विंटल इतका होता, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबरला तो वाढून थेट ८ हजार ४३० रुपयांवर पोहचला. सलग दोन दिवस बाजारात झालेल्या या वेगवान वाढीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
advertisement
आवक वाढली,पण दर्जेदार मालाला जास्त भाव
वाशिम बाजार समितीत शुक्रवारी एकूण २० हजार क्विंटलांपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली. यामध्ये सुमारे ५ हजार क्विंटल बिजवाई सोयाबीनची नोंद झाली. अलीकडील अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी, चांगल्या प्रतीचा आणि स्वच्छ धान्य असलेल्या बिजवाई सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांमध्ये उच्च दर्जाच्या मालासाठी बोली लावण्याची चढाओढ सुरू होती.
व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, शेतकऱ्यांमध्ये समाधान
उच्च दरामुळे बाजार समिती परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक शेतकरी आपल्या उत्पादनाला मिळालेल्या दरामुळे आनंदी दिसले. वाशिमसह आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांनीही आपला माल विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. काही व्यापाऱ्यांनी तर उच्च दर्जाच्या बिजवाई सोयाबीनसाठी आगाऊ बुकिंग सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की, “वाशिम बाजार समितीत सलग दोन दिवस बिजवाई सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहेत. यंदा प्रथमच या जातीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, यापूर्वी इतका दर कधीच मिळालेला नाही. व्यापाऱ्यांकडून या जातीला विशेष मागणी असल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे.”
बाजाराचा कल पुढे कसा राहील?
सध्याचा दर टिकून राहण्यासाठी आवक आणि गुणवत्तेचा समतोल महत्त्वाचा ठरणार आहे. बिजवाई सोयाबीनची मागणी वाढल्यास दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
