Konkan Railway: आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, कोकणात जादा गाड्या धावणार, वेळापत्रक आणि थांबे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Anganewadi Jatra 2026: या निर्णयामुळे आंगणेवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तसेच तिकीट आरक्षणावर आलेला ताण पाहता यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नव्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 01004 मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन विशेष रेल्वे दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता मडगाव जंक्शन येथे दाखल होईल.
advertisement
यापूर्वी कोकण रेल्वेने आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. त्याअंतर्गत दि. 7 आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर दोन विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या होत्या. तसेच दि. 8 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव या मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने रेल्वे प्रशासनाने आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
थांबे कुठं?
या विशेष रेल्वेगाड्यांना करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आंगणेवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 8:12 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, कोकणात जादा गाड्या धावणार, वेळापत्रक आणि थांबे







