पूरबाधित पशुपालकांना मोठा दिलासा
या नव्या निर्णयामुळे केवळ मृतच नव्हे, तर पूरात वाहून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या पशुधनाचाही आता मदतीसाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांना याचा थेट फायदा होणार आहे.
जुने जाचक निकष शिथिल
पूर्वी लागू असलेले राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण चे काही कडक निकष आता शिथिल करण्यात आले आहेत. आधी ही मदत केवळ अल्प व अत्यल्प भूधारकांपुरती मर्यादित होती, मात्र आता सर्व आपत्तीग्रस्त पशुपालकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
advertisement
मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया
मृत किंवा बेपत्ता पशुधनाच्या नुकसानीसाठी मदत मिळवण्यासाठी संबंधितांना शवविच्छेदन अहवाल किंवा पंचनाम्याची प्रत तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे.
पंचनाम्यासाठी विशेष समिती
नुकसानाचे अचूक आणि पारदर्शक मूल्यांकन व्हावे यासाठी शासनाने विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीत पशुधन विकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील किंवा सरपंच, सहकारी दूध संघाचे प्रतिनिधी आणि संबंधित पशुपालक यांचा समावेश असेल.
ही समिती प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याने खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत लवकर पोहोचण्यास मदत होईल.
जनावरांच्या संख्येवरील मर्यादा हटवली
नव्या नियमांनुसार, पूर्वी असलेली जनावरांच्या संख्येची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी मदत केवळ तीन दुधाळ जनावरांपर्यंत मर्यादित होती. आता मात्र मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र असतील. तसेच, कुक्कुटपालन व्यवसायावरील निर्बंध शिथिल करण्यात आल्याने पोल्ट्रीधारकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
मदतीचे सुधारित दर (प्रति पशू)
मृत दुधाळ जनावर : ३७,५०० रुपये
ओढकाम करणारे जनावर : ३२,००० रुपये
लहान जनावरे : २०,००० रुपये
शेळी/मेंढी : ४,००० रुपये
कोंबडी : १०० रुपये (प्रति पक्षी)
गोठा पडझड/नष्ट : ३,००० रुपये
