ब्रोकोलीचे वाढते महत्त्व
ब्रोकोली ही कोबीवर्गीय भाजी असून ती प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल्स आणि ऑनलाइन भाजी विक्री प्लॅटफॉर्मवर ब्रोकोलीला सतत मागणी असते. त्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा ब्रोकोली शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
फेब्रुवारीत लागवड का फायदेशीर?
फेब्रुवारी महिन्यात हवामान कोरडे व सौम्य असल्याने ब्रोकोलीच्या वाढीस पोषक परिस्थिती मिळते. या काळात कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. मार्च-एप्रिलमध्ये काढणी झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाजारात चांगला दर मिळतो. यामुळे उत्पादन आणि नफा दोन्ही वाढण्यास मदत होते.
advertisement
एकरी खर्च किती येतो?
ब्रोकोली शेतीसाठी सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असला तरी नफा त्याहून अधिक मिळतो.
बियाणे किंवा रोपे : १५,००० ते २०,००० रुपये
जमीन तयारी व मशागत : ८,००० ते १०,००० रुपये
खते व सेंद्रिय खत : १०,००० ते १२,००० रुपये
ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन : ५,००० ते ७,००० रुपये
मजुरी व इतर खर्च : ८,००० ते १०,००० रुपये
एकूण खर्च साधारणपणे ४५,००० ते ६०,००० रुपये प्रति एकर येतो.
उत्पादन आणि नफ्याचे गणित
योग्य व्यवस्थापन केल्यास एका एकरातून ६ ते ८ टन ब्रोकोलीचे उत्पादन मिळू शकते. बाजारात ब्रोकोलीला दर्जानुसार प्रतिकिलो ६० ते १०० रुपये दर मिळतो. सरासरी ८० रुपये दर गृहीत धरल्यास एकरी ४.८ ते ६.४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. खर्च वजा जाता शेतकऱ्याला ३.५ ते ५ लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळण्याची शक्यता असते.
