आयुष्याला कलाटणी देणारा काळ
गौतम राठोड हे अनेक वर्षे मेहनतीने आपला व्यवसाय सांभाळत होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी गार्डनिंगचं काम केलं, मात्र हे काम हंगामी असल्याने आर्थिक स्थैर्य मिळत नव्हतं. त्यानंतर त्यांनी गॅरेज आणि मेकॅनिकल क्षेत्रात प्रवेश केला. तब्बल वीस वर्षे त्यांनी या व्यवसायात प्रामाणिकपणे काम केलं. आयुष्य सुरळीत सुरू असतानाच अचानक त्यांच्या आरोग्याने गंभीर वळण घेतलं.
advertisement
कॅन्सरचं निदान आणि संघर्ष
एका नियमित तपासणीत त्यांच्या किडनीमध्ये गाठ आढळली. पुढील तपासणीत ही गाठ कॅन्सरची असल्याचं स्पष्ट झालं. हा धक्का सहन करणं कोणासाठीही अवघड होतं. उपचारासाठी त्यांची एक किडनी काढावी लागली. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आणि आर्थिक तसेच मानसिक अडचणी वाढल्या. काही काळ ते खचलेही, मात्र हार मानण्याऐवजी त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्धार केला.
नव्या आशेची बीजं
कॅन्सरशी सहा ते आठ महिने चाललेल्या संघर्षात त्यांनी असह्य वेदना सहन केल्या. हळूहळू प्रकृती सुधारू लागल्यानंतर गौतम राठोड यांनी पुन्हा कामात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला. याच काळात त्यांच्या नातेवाईकांनी केसर शेतीविषयी माहिती देणारा एक व्हिडीओ त्यांना पाठवला. तो व्हिडीओ त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
केसर शेतीकडे वाटचाल
केसर शेतीचा विचार मनात आला खरा, पण त्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवणं गरजेचं होतं. गौतम राठोड यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन, तज्ज्ञांशी संवाद साधून आणि आधुनिक शेती पद्धतींचा अभ्यास करून माहिती गोळा केली. अखेरीस त्यांनी एरोफोनिक आणि व्हर्टिकल फार्मिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घराच्या एका खोलीतच केसर शेती सुरू केली. पारंपरिक शेतीपेक्षा ही पद्धत कमी जागेत आणि नियंत्रित वातावरणात उत्पादन देणारी ठरली.
उत्पादन आणि आर्थिक यश
या केसर शेतीतून दरवर्षी सुमारे अर्धा किलो केसर उत्पादन घेतलं जातं. बाजारात एका ग्रॅम केसरची किंमत साधारण सातशे ते आठशे रुपयांपर्यंत असते. एका हंगामात किमान तीन वेळा उत्पादन मिळत असल्याने उत्पन्नही लक्षणीय ठरतं. या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर गौतम राठोड यांनी केवळ आर्थिक संकटांवरच नाही, तर आयुष्यातील मोठ्या अडचणींवरही मात केली आहे.
प्रेरणादायी प्रवास
आज गौतम राठोड यांची ओळख केवळ कॅन्सरवर मात केलेल्या व्यक्तीची नाही, तर आधुनिक शेतीच्या माध्यमातून यश मिळवलेल्या शेतकऱ्याची आहे. आजार, अपयश आणि मर्यादा असूनही जिद्दीने पुढे जाता येतं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी आणि नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
