भागवत एकादशी आणि तिथी: पंचांगानुसार, पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी 30 डिसेंबरला सुरू होत असली तरी, वैष्णव परंपरेनुसार भागवत एकादशी 31 डिसेंबर 2025 रोजी पाळली जाणार आहे. 31 डिसेंबरच्या पहाटेपासून सुरू होणारा हा उपवास नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी सकाळी पारणे करून पूर्ण होईल.
रात्री 1:48 पर्यंतचा उपवास: एकादशीची तिथी 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत असल्याने उपवासाचा प्रभाव रात्री 1:48 पर्यंत राहील. याचा अर्थ असा की, जेव्हा जग नवीन वर्षाचे स्वागत पार्ट्यांमध्ये करत असेल, तेव्हा भाविक भगवान विष्णूच्या नामस्मरणात आणि उपवासात असतील.
advertisement
गुरुवारी नवीन वर्षाची सुरुवात: 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवार आहे. गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरुंचा वार मानला जातो. एकादशीच्या उपवासानंतर वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी येणे हे सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.
2019 नंतरचा दुर्मिळ योग: अशा प्रकारे 31 डिसेंबरला एकादशी आणि 1 जानेवारीला द्वादशी येण्याचा योग यापूर्वी 2019 मध्ये आला होता. 6 वर्षांनंतर पुन्हा हा योग येत असल्याने वारकरी संप्रदाय आणि विष्णू भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे.
सेलिब्रेशन ऐवजी साधना: या दिवशी मद्यपान किंवा तामसिक भोजन (कांदा, लसूण, मांसाहार) टाळून सात्विक आहार घ्यावा. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पार्ट्यांमध्ये जाण्याऐवजी मंदिरात दर्शन घेणे किंवा घरी भजन-कीर्तन करणे अधिक फलदायी ठरेल.
पुत्रदा एकादशीचे फळ: ही पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने संतान सुख, कुटुंबाचे आरोग्य आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. नवीन वर्षाचे संकल्प करताना या एकादशीचे व्रत केल्यास ते संकल्प सिद्धीस जातात अशी श्रद्धा आहे.
