उशिरा झोपण्याचा सर्वाधिक परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. झोपेअभावी स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता ढासळते आणि निर्णयक्षमता कमजोर होते. अनेकांना सतत चिडचिड, अस्वस्थता आणि तणाव जाणवतो. यामागे हार्मोन्सचे असंतुलन हे प्रमुख कारण आहे. झोप कमी झाल्याने कोर्टिसोल या ताण वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो. याचा परिणाम कामाच्या ठिकाणी कार्यक्षमतेवरही होतो.
advertisement
पचनसंस्थेवरही उशिरा झोपण्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. अनियमित झोपेमुळे भूक न लागणे, आम्लपित्त, गॅस, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी वाढतात. झोपेची कमतरता भूक वाढवणाऱ्या हार्मोन्सना सक्रिय करते, त्यामुळे जंक फूड खाण्याची इच्छा वाढते आणि वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. लठ्ठपणा वाढल्यास मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठीही उशिरा झोपणे धोकादायक ठरत आहे. संशोधनानुसार, नियमितपणे उशिरा झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो. झोपेअभावी रक्तदाब नियंत्रित राहत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार वारंवार होतात.
त्वचेवरही झोपेचा थेट परिणाम दिसून येतो. उशिरा झोपणाऱ्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे, पिंपल्स आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आरोग्य चांगले राखायचे असेल तर रात्री वेळेवर झोप घेणे, स्क्रीनचा वापर कमी करणे आणि नियमित दिनचर्या पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.





