अशी ही आरोग्य सेवा! अवघ्या 5 रुपयांत उपचार, उमेश यांचा अनोखा उपक्रम काय? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ते अवघ्या पाच रुपयांत आरोग्य सेवा देत आहेत. यामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा दिलासा मिळत आहे.
पुणे : मागील काही वर्षांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला घरखर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशातच आजारपण आले तर रुग्णालयाचा खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न उभा राहतो. किती पैसे लागतील याचा नेम नसल्याने अनेक जण उपचार घ्यायलाही घाबरतात. हीच अडचण लक्षात घेऊन पुण्यातील उमेश चव्हाण यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ते अवघ्या पाच रुपयांत आरोग्य सेवा देत आहेत. यामुळे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. या उपक्रमाविषयी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी लोकल 18 ला दिली आहे.
उमेश चव्हाण यांनी सांगितलं की, रुग्ण हक्क परिषदेच्या पृथ्वी मोबाइल क्लिनिक या उपक्रमातून केवळ पाच रुपयांत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार दिले जात आहेत. नुकतेच या उपक्रमाचे 111 वे शिबिर पार पडले. आतापर्यंत 10 हजार 77 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. पुण्यातील सुमारे 60 ठिकाणी ही मोबाइल आरोग्यसेवा पोहोचत असून, प्रत्येक शिबिरात दोन डॉक्टर, दोन नर्स, एक वाहनचालक, एक समन्वयक आणि दोन मदतनीस अशी टीम कार्यरत असते. या सगळ्याचा खर्च ते स्वतः करत आहेत.
advertisement
तसेच गरजूंना एमआरआय आणि सिटी स्कॅनसारख्या महागड्या तपासण्या देखील मोफत करून दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. गंभीर स्वरूपाच्या आजारांवर शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तसेच प्रत्येक वस्तीत महिन्यातून किमान एकदा शिबिर घेऊन तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
advertisement
बाबा आढाव यांच्याकडून प्रेरणा
कष्टकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी गरजूंकरिता अवघ्या दहा रुपयांत झुणका-भाकर केंद्र सुरू करून सामाजिक उपक्रम उभा केला होता. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेत, गरजू नागरिकांना दर्जेदार तपासणी, उपचार आणि औषधोपचार केवळ पाच रुपयांत उपलब्ध करून देण्याचा पुढाकार रुग्ण हक्क परिषदेने घेतला आहे. पृथ्वी मोबाइल क्लिनिक या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 107 ठिकाणी आरोग्यसेवा देण्यात आली आहे. रुग्ण हक्क परिषदेशी संलग्न ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असून, त्यासाठीचा संपूर्ण खर्च उमेश चव्हाण यांच्या पुढाकारातून केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 5:15 PM IST







