काय आहेत या राशीची स्वभाव वैशिष्ट्ये?
धनु राशी ही राशी राशीचक्रातील नवव्या क्रमांकाची असल्याने जन्मकुंडलीत नऊ या अंकांनी ही राशी दर्शवली जाते. आकाशात ही रास आपणास शिकाऱ्याच्या स्वरूपात दिसते. राशीचे जर चिन्ह पहिले तर, त्यामध्ये ही रास अर्धी पुरुष तर अर्धी प्राणी असलेली आहे. त्यातील कमरेपर्यंतचा भाग हा हातामध्ये धनुष्य घेतलेल्या शिकाऱ्याचा असून कमरेपासून खालील भाग हा घोड्याचा आहे. ही गुरु या ग्रहाची राशी असून अग्नी तत्वाची आणि द्विस्वभाव असणारी आहे. गुरु हा सात्विक ग्रह या राशीचा स्वामी असल्याने या राशीचे लोक पापभिरू असल्याचे दिसून येतात. अध्यात्म आणि धार्मिकता यांची यांना आवड असते. ही अग्नी तत्वाची राशी इतरांना त्यांच्या आयुष्यात मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी कायम मदत करीत असते. मार्ग दाखवण्याचे काम या राशीला चांगल्या पद्धतीने जमते. द्विस्वभाव असल्यामुळे निर्णय घेताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. त्यामुळे निर्णय घेताना इतरांचा सल्ला घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
क्षत्रिय वर्णाची रास असल्यामुळे इतरांना कायम मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्याची इच्छा असते आणि त्यामध्ये कार्यरत असतात. यांना खोटेपणा आवडत नाही. खऱ्या खोट्याची शहानिशा लगेच करण्याची वृत्ती असल्याने शत्रू वाढतात. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची वृत्ती असल्याने घरच्यांपेक्षा बाहेरच्यांची कामे किंवा त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी वेळ भरपूर देतात. कायम मदत करण्यासाठी पुढाकार घेतलेला असतो. राशीचे जर चिन्ह पहिले तर सुरुवातीचा भाग जो शिकार्याचा आहे तो धाडसी प्रवृत्ती दाखवतो. तो शिकारी हातात धनुष्य घेतलेला आहे त्यामुळे सावध आणि लक्ष देऊन काम करण्याची प्रवृत्ती असते. इतरांना काम करायला प्रवृत्त करतात. काम करून घेणे यांना चांगल्या पद्धतीने जमते.
निम्मा भाग हा घोड्याचा असल्याने झटपट काम करणे यांना आवडते. एका जागी स्थिर राहत नाहीत, कायम कामात स्वतःला वाहून घेतात. घोड्याच्या अंगी असणारी चपळता आणि ऊर्जा यांच्यामध्ये असते. त्या कारणाने कायम हे लोक घोड्यावर बसलेले दिसून येतात म्हणजेच गडबडीत असलेली दिसतात. यांचा मित्रपरिवार मोठा असतो. विविध क्षेत्रातील लोकांमध्ये यांच्या ओळखी असतात. समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. काटेकोरपणे काम करणे यांना आवडते. त्यामुळे सुपरवायझर, व्यवस्थापक अशा पद्धतीच्या कामात हे लोक असलेली दिसून येतात. काम करून घेणे यांना फार चांगले जमते, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
ग्रहमान बदलाचा काय होणार परिणाम?
वर्षाच्या पराक्रमात असणारा शनी ग्रह हा 29 मार्च रोजी आपल्या कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करत असल्याने तो चौथा येतोय. तिसरा शनी हा बऱ्याच परिश्रमानंतर आर्थिक प्राप्ती दर्शवतो. त्यामुळे वर्षाचा आरंभ हा परिश्रमाचा दाखवतोय. 29 मार्च नंतर मात्र येणारा चौथा शनी हा ढैय्या पनोती घेऊन येतोय. ही पनोती अडीच वर्षे राहील. शनी हा कर्मदाता म्हणून ओळखला जातो. ही रास पापभिरू असून इतरांना मदत करणारी असल्याने या पनोतीमध्ये फार काळजी करण्याचे कारण नाही. उलट या ढैय्यामध्ये स्थावर आणि वाहनयोग देत असून, आलेल्या संधीचा योग्य वेळेस फायदा मात्र उचलता आला पाहिजे. तरच ती फलदायी ठरू शकेल, कारण या शनी सोबत राहू देखील मे महिन्यापर्यंत चौथा असणार आहे.
आगामी वर्ष हे आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणारे असून व्यवसायामध्ये वृद्धी करणारे आणि नवनवीन कल्पनांना उभारी देणारे असेल. नोकरीमध्ये प्रमोशननंतर वरिष्ठांचा त्रास होत राहील. त्यामुळे आपला विरोध हा उघडपणे इतरांसमोर व्यक्त करू नये. आपली प्रगती ही आपल्या जवळच्याच लोकांना फारशी रुचणार नाही. त्यामुळे ते लोक आपल्या प्रगतीला बाधा निर्माण करण्याचे काम करतील, त्यामुळे नियोजित गोष्टी या फार लोकांसमोर व्यक्त करू नये. नाहीतर त्या पूर्ण होण्याला विरोध निर्माण होईल, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
29 मार्चनंतर 14 मे रोजी गुरु हा ग्रह राशी बदल करीत असून तो श्रेष्ठ स्थानातून सप्तम स्थानात प्रवेश करीत आहे. षष्ठ स्थानातील गुरु नोकरी आणि व्यवसायामधील होत असलेला ताणतणाव दर्शवतो. हा तणाव साधारण मे महिन्यापर्यंत राहील. गुरु बदलानंतर मात्र हा तणाव दूर होईल व आपल्या प्रगतीस पोषक असे वातावरण राहील. नोकरीतला किंवा व्यवसायातला ताण तणाव जरी दूर होणारा असला तरी आपल्या जोडीदारासमवेत मात्र काहीसे तणावाचे वातावरण राहील. त्यामुळे त्या ठिकाणी आपण आपल्या रागावरती आणि स्पष्टवक्तेपणावरती थोडेसे नियंत्रण ठेवावे जेणेकरून परिस्थिती आपल्या विरोधात जाणार नाही. बदलणारा गुरु आपल्या कर्तुत्वाला चांगले भाव मिळवून देईल. तसेच हा काळ आपणास भाग्यकारक असून या काळात भाग्य आपणास साथ देईल.
विद्यार्थी वर्गात देखील आगामी येणारा काळ हा अतिशय शुभ असून स्पर्धा परीक्षा, विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा या मनोजोग्या निकाल देणाऱ्या राहतील. आपण घेतलेले कष्ट फलद्रुप होतील आणि त्याचे फळ आपणास मिळेल. विवाह आणि संततीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी मे महिन्यानंतर प्रयत्न करावेत. त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच यश प्राप्त होईल. महिला वर्गासाठी देखील येणारा काळ हा शुभ फलदायक असून घरगुती आघाडीवरती मात्र थोडासा वादविवाद निर्माण करणारा असेल. घरातील व्यक्तींसोबत होणारे वाद शक्यतो टाळावेत. गोष्टींची शहानिशा करायला किंवा खरे खोटेपणा तपासायच्या भानगडीत पडू नये. त्याचा आपणासच मानसिक त्रास होत राहील.
साधारणपणे वर्षाच्या मध्यंतरानंतरच बरेचशे ग्रह बदल होत असून हे ग्रह बदल वर्षाच्या मध्यानंतर थोडेसे चिंता निर्माण करणारे आहेत. मात्र या काळात आपणास स्थावर आणि वाहन तसेच व्यवसायात देखील वृद्धी निर्माण करणारे असून ही वृद्धी काहीशी मानसिक चिंता देणारी असेल. म्हणजेच आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात कष्ट वाढवणारी असेल, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
कोणती उपासना कराल?
येणाऱ्या वर्षात आपण अध्यात्माकडे वळाल आणि जाणीवपूर्वक देवधर्म कराल. आत्तापर्यंत आपण कामाच्या व्यापातून देवधर्म करायला वेळ मिळत नाही. देव आम्हाला समजून घेईल अशा पद्धतीत जे काही वागत होता ते मात्र कष्ट व चिंता वाढल्यामुळे देवाकडे त्यातून सुटका होण्यासाठी मागणी कराल. त्याकरता देवदर्शन, जपजाप्य आणि स्तोत्रपठण आपले वाढलेले असेल.
त्यामुळे तहान लागल्यावर विहीर करण्यापेक्षा आपल्या दिवसातील 24 तासांतील काहीशी मिनिटे आपण अध्यात्मासाठी आणि आपल्या देवधर्मासाठी खर्ची करावीत जेणेकरून येणारा जो कष्टकारक काळ आहे तो आपणास सुखकारक जाईल. आपल्यासाठी दत्तात्रयांची उपासना लाभदायक असून दत्त तत्त्व असलेल्या कोणत्याही क्षेत्री आपण जाऊन दर्शन घेऊ शकता. शक्यतो व्यसनांपासून दूर राहावे.
मद्यपान आणि मांसाहार या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा कारण शनीच्या ढैय्यामध्ये या गोष्टी आपल्यामध्ये नकारात्मक विचार पसरवायला मदत करतील. त्यासाठी आपण अगोदरच या गोष्टींपासून दूर राहिलेले आपणासाठी फायदेशीर ठरेल. नियम आणि कायदा मोडला जाणार नाही तसेच आपल्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. वडीलधाऱ्यांचा आणि हाताखालील लोकांचा मान राखावा. येणाऱ्या वर्षात काही गोष्टी हरवण्याची अथवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. गडद रंगांची कपडे वापरणे टाळावे. वाहन जपून चालवावे. आरोग्याच्या दृष्टीने फारशी काळजी करणारा काळ नसला तरी तणावामुळे रक्तदाब वाढू शकतो त्यामुळे अकारण तणाव घेऊ नये, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





