भारुड जेव्हा सादर होते तेव्हा त्यातल्या नाट्याची खरी उकल होते. भारुडातून दिला जाणारा संदेश हा भारुडातल्या अभंगाच्या शब्दातून आणि सादर करणाऱ्याच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. भारुडाला येणारा प्रेक्षक हा नाटक, तमाशा पहाणाऱ्या वर्गातला नाही, या नाट्यातून निव्वळ करमणूक करुन घेणे हे त्याचे ध्येय नसते. भारुडाचा प्रेक्षक हा प्रपंचाची आसक्ती असताना परमार्थाची ओढ असलेला असतो. अगदी विद्वान पंडितापासून, निरीक्षर स्त्रिया, पुरुषांपर्यंत हा वर्ग आहे. या वर्गात असलेले उच्च, नीच, राव रंक सगळेच भारुडाचे चाहते असतात.
advertisement
नाचत पंढरी जाऊ रे खेळीया । विठ्ठल-रखुमाई पाहू रे ।।धृ।।
बारा ही सोळा गडीयाचा मेळा, सतरावा बसवंत खेळीया रे ।
जातिस पद राखो जेणे टिपरिया घाई, अनुहाते वाये मांदळा रे ।।१।।
सा चहू वेगळा अठराही निराळा, गाऊ वाजवू एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा नेणें पाणी, तारुण्य देहभाव बाळा रे ।।२।।
आनंद तेथिचा मुकीयांसी वाचा, बहिरे ऐकती कानी रे ।
आंधळ्यासी डोळे पंगूळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे ।।३।।
वारीच्या वाटेवर चालणारा वारकरी दिवसभर नामसंकीर्तनात बुडून गेलेला असतो. दिंडीच्या सकाळच्या प्रस्थानानंतर दिवसभरात त्यांच्या ठरलेल्या क्रमानुसार अभंग, ओव्या, गवळणी गात असतात. टाळ, मृदुंगाच्या तालावर न थकता त्याचा हा प्रवास चालू असतो. एक पाऊल पुढे अन एक पाऊल मागे टाकत मृदंगाच्या तालावर दंग झालेला वारकरी; गवळणी, भारुड गाण्याची वेळ येते तेव्हा एकदम जोशात येतो. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचा उत्साह फार वेगळा असतो. ते नानाविध खेळ खेळत जात असतात. त्याच्याकडे पाहून पक्षीही चारा नेणे विसरून जातात. इतकेच नव्हे तर या वारीत चालताना जे वृद्ध आहेत तेही तरुण होऊन जातात.
असे म्हणत म्हणत सरते शेवटी वारकरी पंढरीला पोहोचतो. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भजन, कीर्तनाच्या जोडीने अनेक ठिकाणी भारुडे रंगतात. वारीखेरीज इतर वेळी घडून येणाऱ्या हरिनाम सप्ताहात भारुडाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. भारुड सुरु झाले की ऐकणाऱ्याला स्थळ-काळाचे भान उरत नाही. तसे पाहायला गेले तर भारुडे सादर करण्याच्या वेळा, ठिकाणे ठराविकच आहेत. यात्रा, उत्सव इत्यादी ठिकाणी किंवा हरिनाम सप्ताहात रात्रीच्या कीर्तनानंतर भारुड होणार असल्याचे जाहीर केले जाते अन मग त्या भारुडासाठी गर्दी गोळा होते. पैठण, पंढरपूर, देहू आळंदी येथील यात्रा महोत्सवात सादर होणारी भारुडे फारच दर्जेदार म्हणून प्रसिद्ध आहेत.
एकनाथ महाराजांच्या इतकी वैविध्यपूर्ण भारुडे इतर कोणत्याही संतांनी रचली नाहीत हे सर्वश्रुत असले तरी इतर संतांनी रचना केल्या होत्या. आज आपण संत जनाबाईंच्या भारुडाचा आस्वाद घेऊ.
संत जनाबाई. नुसत्या आठवणीनंही गहिवरून यावं, अशी माऊली. तेराव्या शतकात या अनाथ जनाबाईंनी जे कर्त्तृत्त्व गाजवलंय, त्याला तोड नाही. लोकप्रियता एवढी की, तेव्हा घरोघरची जाती तिच्या ओव्यांशिवाय फिरायची नाहीत. आजही तिचे शब्द लाखो महिलांना जगण्याचं बळ देतात. नामदेवरायांनी विटेवरचा श्री विठ्ठल बोलता केला, तर जनाबाई त्याला प्रत्येक देव्हाऱ्यात घेऊन गेल्या. जनसामान्यांच्या भाषेत बोलणाऱ्या जनाबाईंनी वारकरी संप्रदायाचा खराखुरा विस्तार केला. त्या त्यांचेच जगणे जगल्या, म्हणूनच रंजल्या-गांजल्या कष्टकर्यांना, दबल्या-पिचल्या सासुरवाशिणींना, पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या बायाबापड्यांना जनाबाई जवळच्या वाटल्या.
वृक्ष लागले अंबरी। डोलतात नानापरी।। फणस कर्दळी गंभेरी। आंबे नारळ खर्जुरी।।
असं निसर्गाचं, वृक्षवेलींचं जनाबाईंनी केलेलं मनोहारी वर्णन वाचताना मनाच्या त्यांच्या हळवेपणाची जाणीव नक्कीच होते. या अभंगावरून तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची आठवण आल्याशिवाय रहात नाही. नक्कीच या दोघांमध्ये कुठेतरी साम्य असणार. 'नाठाळाच्या माथी' सोटा हाणायला निघालेले तुकोबा पाहिले की, अंगणात उभे राहून थेट देवाला शिव्या घालणाऱ्या जनाबाई दिसतात. आपल्या मनात निर्माण झालेला अहंपणा निघून जाणीसाठी संत जनाबाईंनी रचलेले हे भारुड..
खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद । मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी । गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे । एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
मनातल्या अहं भावाला मारुन टाकल्याशिवाय परमात्म्याची भेट होणे निव्वळ अशक्य आहे. संत जनाबाईंनी आपल्या भारुडात निरनिराळ्या रुपकांची योजना करुन त्यांना ईश्वर चरणी लीन व्हायची इच्छा आहे हे देवाला सांगितले आहे.
खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
ईश्वराची भक्ति करण्याचे अनेक मार्ग आहेत. ईश्वराचे हे भक्तपण फारच हुशार असतात. देवालाच गुंडाळून ठेवायचा प्रयत्न करतात. ‘आवळा देऊन कोहळा’ काढायचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याला हवी असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी तो देवाला नवस करतो. या नवसातून देवाला लालूच देऊन आपले ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
पण सगळेच भक्त काही सारखे नसतात. काहीजण केवळ आपल्याला देवाच्या भक्तीत रममाण व्हायला मिळावे म्हणून देवाला आपल्या भक्तीची लालूच देतात. या अभंगातून संत जनाबाई देवाकडे असाच नवस करत आहेत. त्यांना देवाच्या पायाशी लीन व्हायचे आहे म्हणून हा नवस आहे. त्यांच्या नवसाचे वेगळेपण या ईश्वर भक्तीत आहे.
त्या म्हणतात, हे खंडेराया माझ्या मनात अहंकार रूपी सासू आहे ती मला तुझ्या चरणांशी लीन होण्यापासून रोखते आहे. मला तुझ्या भक्तीत मिसळून जायचे आहे, परंतु मनातला हा अहं भाव मला रोखतो आहे. माझ्या मनातल्या या अहं भावाला तु मारुन टाक म्हणजे तुझ्याकडे येण्याची माझी वाट सुकर होईल.
जीवनात अनेक गोष्टींचे साहचर्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्यातही नवरा बायकोचे संबंध हे साहचार्याचे उत्तम उदाहरण आहे. दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून (दोघांनीही मान्य केले नाही तरीही) असतात. एकाच्या मृत्यूनंतर दुसराही इहलोकांची यात्रा आटोपतो असे अनेकदा दिसून येते. तसेच साहचर्य अहंकार आणि अभिमान यात दिसून येते. दोघेही हातात हात घालून पुढे जात असतात. म्हणून ही जनी म्हणते, खंडेराया माझ्या मनातली ही अहंकार रूपी सासू मेली की अभिमान रुपी जो सासरा माझ्या नशिबात आहे त्याचाही आसरा तुटेल. आणि मी तुझ्या भक्तीसाठी मोकळी होईन.
सासरा मेलिया होईल आनंद । मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
सासू गेल्यामुळे आसरा गमावलेला सासरा गेला. मनात शिल्लक राहिलेली वासना आहे तिचाही अंत होणे आवश्यक आहे. ही वासनारूपी नणंद माझ्या शरीरात वास करुन आहे. तुला मी नवस केलेला आहेच त्यात मी अजून थोडी भर घालते, माझी मागणी वाढवते. माझ्या मनातल्या अहंकाराला आणि अभिमानाला तु संपवले आहेस, अजून थोडीशी मला मदत कर माझ्या मनातल्या या वासनारूपी नणंदेला ही तु नष्ट कर.
नणंद सरतां होईन मोकळी । गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे । एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
हे खंडेराया, माझ्या मनातला अहंकार सरला आहे, अभिमानाच्या जोडीने वासनाही दूर पळाली आहे. तुझ्या चरणी लीन होण्याला अडथळा आणणाऱ्या सगळ्या गोष्टी आता माझ्या मनातून गेल्या आहेत. आता मी तुझ्या भंडाऱ्याची झोळी माझ्या गळ्यात घालून तुझ्या चरणांशी लीन व्हायला तयार आहे. माझ्या मनातल्या या सगळ्या रिपुंचे दमन करुन मला मोहपाशातून मोकळी कर, म्हणजे मी एकटीच असेन, मला तुझी भक्ति करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
लेखक, संकलक: डॉ नरेंद्र भिकाजी कदम.