चमोली : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगचे अनेकांना मोठ्या प्रमाणात व्यसन लागले आहे. यातच एका अल्पवयीन मुलाने ऑनलाईन गेमिंगच्या नादात आपल्याच घरात तब्बल 40 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
advertisement
चंपा गैरोला यांच्या घरी ही घटना घडली. त्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गोपेश्वर येथील रहिवासी आहेत. चंपा या आपल्या मुलीला भेटायला डेहराडून याठिकाणी गेल्या होत्या. मात्र, त्या परतल्या तेव्हा त्यांना घराचा दरवाजा हा मोडलेला दिसला. तसेच त्यांच्या सासूच्या खोलीतील लॉकरचे लॉकही मोडले होते आणि त्यातील मौल्यवान दागिनेही गायब होते. इतकेच नव्हे तर त्यांचेही दागिने चोरी झाले होते. या सर्व दागिन्यांची किंमत ही तब्बल 35-40 लाख रुपये सांगण्यात आली.
या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी अज्ञातांविरोधा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला असता तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
चमोली येथील पोलीस अधीक्षक सर्वेश पंवार यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलीस उपअधीक्षक संजय गर्ब्याल यांनी सीसीटीव्हीच्या आधारावर तपास केला आणि तांत्रिक विश्लेषणही केले. त्यातून त्यांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. यानंतर पीडित महिलेचा अल्पवयीन मुलगाच या चोरीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
आई वडिलांच्या मोबाईलचा लॉक उघडला नाही, 7 वर्षांच्या मुलानं थेट पोलिसांनाच बोलावलं, मग काय घडलं?
पोलिसांना त्याने सांगितले की, त्याला बऱ्याच काळापासून ऑनलाइन गेमिंग, ट्रेडिंग आणि महागड्या वस्तू खरेदी करण्याचा शौक होता. यासाठी त्याने अनेक लोकांकडून कर्जही घेतले होते. तसेच या चोरीत सहभागी असलेल्या अन्य एका अल्पवयीन मुलाकडूनही त्याने 50 हजार रुपये उसने घेतल्याची धक्कादायक माहिती दिली. यातूनच बाहेर येण्यासाठी त्याने आपल्याच घरात चोरीचा कट रचला.
आपल्या घरात आई आणि आजीचे लाखो रुपयांचे दागिने आहेत. ते विकून तो नफा कमवू शकतो, असे आमिष दाखवत त्याने आपल्या दोन मित्रांनाही आपल्यासोबत घेतले, यानंतर त्याची आई डेहराडूनला गेल्यावर त्याने संधीचा फायदा घेतला आणि मित्रांना घरी बोलावून ही चोरी केली, अशी कबुली त्याने पोलीस चौकशीत दिली. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.