तेल्हारा तालुक्यातील घोडेगावात एका तरुणाने शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव तिचा खून केला होता. आरोपी मुलाला अखेर तीन महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. विनोद समाधान तेलगोटे असं आरोपीचं नाव असून त्याला अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्याचे पोलिसांनी कारवाई करत ही अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी १९ मार्च रोजी आरोपी विनोदने शेतीच्या वादातून आई-वडिलांशी भांडण केलं होतं. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीनं आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात त्याची आई बेबाबाई ऊर्फ गोकर्णा तेलगोटे जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर फिर्यादी विजय तेलगोटे यांनी मुलाविरोधात तक्रार दाखल केली.
advertisement
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विनोद यास दारूचं व्यसन आहे. तो नेहमीच आई-वडिलांशी शेतीचा हिस्सा आणि उत्पन्नाच्या पैशांवरून वाद घालत असे. १९ मार्चच्या रात्रीच्या घटनेत आरोपीनं अशाच प्रकारे वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने आईची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिन्यानंतर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.