जुई गडकरी ठरलं तर मग मालिकेत काम करतेय. मालिकेचं शूटींग मढ आयलँड येथे सुरू आहे. दररोज या ठिकाणी शूटींगला जाणं जुईसाठी तसंच इतर कलाकारांसाठीही डोकेदुखी ठरलं आहे. तिथले रस्ते आणि ट्रॅफिकला वैतागून जुईनं तिथली सद्यपरिस्थिती दाखवली.
जुईनं मढ आयलंडकडे जाणाऱ्या रस्त्याचा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शेअर करत ती सविस्तर पोस्ट लिहिली. तिनं म्हटलं, "आज न राहवून ही रील पोस्ट करतेय. गेली 3.5 वर्षं मी मढ आयलँड नावाच्या एका अत्यंत वाईट भागात शूट करतेय. हो, वाईटच कारण इथे कुठल्याच सुविधा नाहीत, अगदी बेसिकही नाहीत. तसं तर हा आयएनएस हमला म्हणजे डिफेन्सचा एरिया आहे. तरीही इतका दुर्लक्षित?"
advertisement
( 'रस्त्यावरच्या लाईट्स गेलेल्या माझ्या गाडीसमोर...' सावळ्याची जणू सावली फेम अभिनेत्याचा भीषण अपघात )
"गेली 3.5 वर्षं इथे रस्त्याचं काम सुरूच आहे. टप्प्या-टप्प्याने सुरू आहे, अगदी आरामात सुरू आहे. रोज नवे खड्डे, रोज नवा त्रास. त्यात शनिवार-रविवारी इथे खास जत्रा लागते अक्सा बीचला. जी अक्षरशः ट्रॅफिकच्या बाबतीत जीवघेणी असते. जर रात्रीही इथे एवढा ट्रॅफिक लागत असेल तर माणसाने नेमकं काय करावं?"
जुईनं पुढे लिहिलंय, "इथे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं? आधीच मुंबईतलं आणि ठाण्यातलं ट्रॅफिक आऊट ऑफ कंट्रोल आहे. जवळपास सगळ्याच मोठ्या सिग्नल्सवर कुठे ना कुठे खोदकाम सुरूच असतं. हे सगळं पार करून माधला यायचं आणि मग ट्रॅफिकमध्ये अडकायचं! हा रोजचा दिनक्रम झालाय. आणि आज अगदीच राहवलं नाही म्हणून ही पोस्ट करतेय. माझ्याआधीही बऱ्याच कलाकारांनी अशा स्टोरीज, रील्स केल्या आहेत; पण उपयोग शून्य. पावसाळ्यात तर इथली परिस्थिती अजूनच वाईट असते."
"मला एक कळत नाही 10 किमीचा रस्ता करायला 3.5 वर्षं लागतात? कशाचीच उत्तरं मिळत नाहीत आणि काही सुधारणा दिसत नाही. हा प्रवास खूप त्रासदायक झालाय. माधमधून बाहेर पडायलाच कधी कधी 2 तास लागतात. आणि त्यानंतर सुरू होतो घरी जाण्याचा प्रवास. आपण खरंच यासाठी पात्र आहोत का? टॅक्स वेळेवर भरा, सगळे नियम पाळा, कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका आणि तरीही अशी ‘सुविधा’ मिळत असेल तर सामान्य माणसाने काय करायचं? मला माहिती आहे यावर अनेक लोक मला ट्रोल करतील. पण एकदा इथे येऊन बघा, मग कळेल परिस्थिती किती वाईट झाली आहे. त्यात एवढ्याशा रस्त्यावरून ट्रेलर्स, मोठे ट्रक्स, बसेसही ये-जा करतात. ट्रॅफिक जॅम होणारच. यावर कधी उपाय मिळेल माहीत नाही. रस्त्याच्या कामाचा वेग कधी वाढेल माहीत नाही.
पोस्टच्या शेवटी जुईनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार श्रीकांत शिंदे आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसंच महापालिका यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे. "प्लिज प्लिज हेल्प करा. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, प्लिज हेल्प", अशा शब्दात जुईनं विनंती केली आहे.
