33 वर्षांच्या शोषणातून, बेड्यांचा वापर, लोखंडी सळीने मारहाण, भीक मागण्यासाठी मिरवणुकांमध्ये चालणे आणि एकांतात ठेवल्यामुळे हत्तीण महादेवी म्हणजेच माधुरी आता अनंत अंबानींच्या 'वनतारा'च्या राधेश्याम मंदिर एलिफंट वेल्फेअर ट्रस्टमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे.
हत्तीण महादेवीला अनेक आजार
आम्ही हत्तीण महादेवीच्या प्रकरणात तेव्हा लक्ष घातले. जेव्हा 2017 मध्ये मानसिक तणावाखाली असलेल्या या हत्तीणीने जैन मठाच्या मुख्य पुजाऱ्याला मारले. त्यावेळी स्थानिक नेते राजू शेट्टी आणि मठाने हत्तीला प्राणीसंग्रहालयात पाठवण्याचा सल्ला दिला होता, असे PETA च्या राधिका सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
सूर्यवंशी म्हणाल्या, तेव्हा PETA इंडियाने आवाहन केले की- प्राणीसंग्रहालय हत्तीसाठी योग्य जागा नाही. कारण त्याला पुनर्वसन (rehabilitation) आवश्यक आहे आणि त्याला वन्यजीव अभयारण्यात हलवले पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च-अधिकार समितीने (HPC) हत्तीणीच्या स्थितीचे विश्लेषण केले आणि निष्कर्ष काढला की तिला ग्रेड ४ संधिवात (arthritis), पायाला गंभीर संसर्ग (degenerative foot rot), तसेच एकाकीपणामुळे मानसिक ताण होता. त्यामुळे न्यायालयाने तिला अभयारण्यात पुनर्वसन करण्याचा आदेश दिला, असे त्यांनी सांगितले.
हे पुनर्वसन महादेवीच्या भल्यासाठी करण्यात आले आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याचे दावे खोटे आहेत. हत्तीणीची नखे वाढलेली होती, जे नैसर्गिक नाही, कारण हत्ती लांब पल्ल्याचे चालतात. याचा अर्थ महादेवी सतत वेदनेत होती आणि एकाच जागी उभे असल्यामुळे तिच्यावर दाब पडत होता. हा अहवाल पाहून, सर्वोच्च न्यायालय, उच्च-अधिकार समिती आणि उच्च न्यायालयाने तिच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की- माधुरी हत्तीणीबद्दल राज्य सरकारचा निर्णय नाही. हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो कायम ठेवला… या प्रकरणात सरकार म्हणून आम्ही फक्त वन विभागामार्फत एक अहवाल सादर केला आहे.
विरोधकांना उत्तर देताना 'वनतारा'ने एका पोस्टमध्ये म्हटले: आम्हाला तिच्याबद्दलच्या प्रेमाची जाणीव आहे. वनतारामध्ये, तिची माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष काळजी घेतली जात आहे. तिला तज्ज्ञांकडून वैद्यकीय मदत आणि मोठा आदर दिला जात आहे.
'माधुरी'साठी उपचाराची योजना
'वनतारा'ने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर उपचाराची योजना पोस्ट केली आहे. माधुरीच्या सुरुवातीच्या आरोग्य तपासणीत, पायांच्या जुनाट समस्या दिसून आल्या, ज्यात वाढलेली नखे आणि क्यूटिकल्स, लामिनायटिसची लक्षणे, उजव्या मागील पायात जुना नखांचा फोड (toenail abscess) आणि दोन्ही गुडघ्यांवर वेदनादायी सूज यांचा समावेश आहे. एक्स-रे मध्ये तिच्या पुढील पायांमध्ये फ्रॅक्चर आणि संधिवात दिसून आला.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे: मूळ कारणांवर उपचार करण्यासाठी, तिचा त्रास कमी करण्यासाठी, चालण्यातील सुधारणा करण्यासाठी आणि तिला बरे करण्यासाठी टीमने एक तपशीलवार उपचार योजना तयार केली आहे. आम्ही तिच्या प्रयोगशाळेतील अहवालांची वाट पाहत असताना, तिच्या पोषणतज्ञांनी (nutritionist) तिच्यासाठी योग्य आहाराची योजना आधीच सुरू केली आहे. सध्या माधुरीला भरपूर विश्रांती, आराम आणि काळजीची गरज आहे. माधुरीबद्दल ज्यांना चिंता आहे अशा प्रत्येकासाठी: आम्ही तुम्हाला पाहत आहोत, आम्ही तुम्हाला ऐकत आहोत. आम्ही तिला उच्च दर्जाची काळजी देण्याचे वचन देतो. जी सौम्य, सातत्यपूर्ण आणि प्रेमावर आधारित असेल.
