पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. तब्बल 90 तासांच्या चर्चेनंतर हा नवीन फॉर्म्युला समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या धोरणात्मक कुशलतेने मोदींचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे चिराग पासवान यांना पुन्हा आघाडीत टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे.
advertisement
लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ला 29 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र सगळ्यात मोठी आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे भाजप आणि जनता दल (युनायटेड) या दोन्ही पक्षांमध्ये समान जागांचे वाटप. दोन्ही पक्ष 101-101 जागांवर निवडणूक लढवतील. हे केवळ एक राजकीय करार नाही, तर बिहारच्या भविष्यातील सत्तासंतुलनाचे संकेत देणारा निर्णय मानला जातो.
नीतीश कुमार ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेतून बाहेर
या जागावाटपाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. बिहारच्या राजकारणात आता नीतीश कुमार किंवा त्यांचा पक्ष जेडीयू ‘मोठा भाऊ’ राहिलेला नाही. गेल्या 30 वर्षांच्या राजकीय इतिहासात ही पहिली वेळ आहे की जेडीयू एवढ्या कमी जागांवर निवडणूक लढवणार आहे.
2020 च्या निवडणुकीत जेडीयू फक्त 43 जागांवर विजय मिळवता आला होता. जी भाजपसोबतच्या आघाडीत त्यांची सर्वात वाईट कामगिरी होती. याच पराभवानंतर नीतीश कुमार यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेत लालू यादवांच्या आरजेडी शिबिरात प्रवेश केला.
मात्र या वेळेस भाजपने पूर्वीचा अनुभव आणि आकडे समोर ठेवत समसमान जागावाटप करण्याचा तर्क मांडला आणि तो नीतीश कुमार यांनाही स्वीकारावा लागला. या फॉर्म्युल्याने नीतीश यांची “वरचष्मा असलेली भूमिका” संपुष्टात आली आहे.
‘महिला रोजगार योजना’पासूनच दिसले संकेत
नीतीश कुमार यांच्या राजकीय स्थितीतील घसरणीचे संकेत आधीच मिळाले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा करण्यात आले. पण या योजनेची घोषणा आणि अंमलबजावणी स्वतः नीतीश कुमार नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.
ही घटना अनेकांसाठी धक्कादायक ठरली. कारण याआधी मुख्यमंत्री नावाने असणाऱ्या योजनांची सुरुवात नेहमी नीतीश कुमारच करत असत. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की- नीतीशजींना हवं होतं की ही योजना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध व्हावी. पण ही स्पष्टीकरणं राजकीय निरीक्षकांना पटली नाहीत. कारण राजकीय महत्त्वाकांक्षा केवळ बिहारपुरती मर्यादित असल्याचं नीतीश स्वतः अनेकदा सांगत आले आहेत. त्यामुळे हा प्रसंग जेडीयूच्या घटत्या प्रभावाचे प्रतीक मानला गेला.
बिहारची “स्टीयरिंग पॉलिटिक्स” बदलली
बिहारच्या राजकारणात एक काळ असा होता. जेव्हा नीतीश कुमार यांच्याकडे राज्याची “स्टीयरिंग” म्हणजेच नियंत्रण मानलं जात होतं. 2015 मध्ये जेव्हा ते लालू यादवांसोबत गेले. तेव्हा लोकांनी त्यांनाच मतदान केलं कारण सत्ता कोणाचीही असो, ‘मुख्य चेहरा’ नीतीशच असतील अशी धारणा होती. “बारात किसी का हो, दूल्हा नीतीश कुमार होंगे” हा जेडीयूचा तो काळातील प्रसिद्ध नारा होता. मात्र या जागावाटपाच्या निर्णयाने त्या नार्याला पूर्णविराम मिळाला आहे.
आता चेहरा मोदींचा
या फॉर्म्युल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की- 2025 ची बिहार निवडणूक नीतीश कुमार यांच्या चेहऱ्यावर नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जाणार आहे. जरी नेतृत्व नीतीश कुमार करतील, तरी प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपच्या नियंत्रणाखालील मोहिमेप्रमाणे असेल.
राजकीय तज्ञांच्या मते, या निर्णयाने केवळ जेडीयूच्या “मोठ्या भावाच्या भूमिकेचा शेवट” झाला नाही, तर हेही स्पष्ट झालं आहे की ही निवडणूक नीतीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीतील कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते.