बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्या भारताकडे रवाना झाल्या आहेत. बांगलादेशच्या लष्करानं हसीना यांना पदाचा राजीनामा देण्यास व देश सोडण्यासाठी केवळ 45 मिनिटांचा वेळ दिला होता. हसीना यांनी राजीनामा दिल्यावर आता लष्कराच्या हातात सत्ता आली आहे. प्रोथोम एलो डेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान निवासात शेकडो आंदोलक घुसले होते. त्यानंतर हसीना लष्कराच्या हेलिकॉप्टरनं भारताकडे रवाना झाल्या.
advertisement
बांगलादेशात वातावरण चांगलंच तापलंय. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी काम करणारा नोकर आता अब्जाधीश झाल्याची बातमी आली होती. तो आता अमेरिकेत राहत असून त्याच्याकडे 284 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शेख हसीना याही जगातल्या प्रभावी महिलांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्याविषयी जाणून घेऊ या.
(Bangladesh Unrest: बांगलादेश का होरपळलं? एकाच दिवसात 100 जणांचा मृत्यू INSIDE STORY)
बांगलादेशच्या इतिहासात शेख हसीना यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून काम केलंय. सध्याचा हा त्यांचा पंतप्रधानपदाचा चौथा कार्यकाळ होता. गेल्या निवडणुकीत त्यांच्या आवामी लीग पक्षानं 300 जागांपैकी 288 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या. हा आपला शेवटचा कार्यकाळ असेल असं त्यानंतर त्या म्हणाल्या होत्या. देशात भडकणाऱ्या विरोधाची त्यांना कदाचित कल्पना आली असेल. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांना वर्षाला 9,92,922.00 रुपये वेतन म्हणून मिळत होते. एका महिन्याला त्यांना 86 हजार रुपये मिळत होते. याव्यतिरिक्त त्यांचे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, शेख हसीना यांची एकूण मालमत्ता चार कोटी 36 लाख रुपये इतकी आहे. 2022 मध्ये त्यांनी एक कोटी सात लाख टाका कमावले होते आणि त्यापैकी एक महत्त्वाचा वाटा कृषी क्षेत्रातून येतो. शेतीमधलं त्यांचं उत्पन्न 2018 च्या तुलनेत अनेक पटींनी वाढलं आहे. शेख हसीना यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न्सनुसार, त्यांचं उत्पन्न एक कोटी 91 लाख रुपये आहे. विविध सिक्युरिटीजद्वारेही त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी एकूण 75 लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट्स व सेव्हिंग बाँड खरेदी केले आहेत.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, हसीना यांच्या नावावर सहा एकर शेतजमीन आहे. मासेमारीतूनही त्यांना उत्पन्न मिळतं. त्यांच्याकडे दान केलेली एक कारही आहे. बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रेहमान यांच्या त्या कन्या. 1968 मध्ये एम. ए. वाजिद मियाँ यांच्याशी शेख हसीना यांचं लग्न झालं. 2009 मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. हसीना यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. विद्यार्थिदशेत त्या ढाका विद्यापीठातल्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय राहिल्या. त्यानंतर देशाच्या राजकारणात आल्यावर खूप संघर्षानंतर त्यांना पंतप्रधानपद मिळालं. गेली अनेक वर्षं त्या पंतप्रधानपदावर होत्या; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून देशात भडकलेल्या आंदोलनांमुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.