Sheikh Hasina: आई-वडील आणि 3 भावांची हत्या, 2 वेळा मृत्यू चुकवला; शेख हसीना यांच्याबद्दल न ऐकलेली स्टोरी!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हता. 1966 मध्ये ईडन महिला महाविद्यालयात शिकत असताना त्यांना राजकारणात रस वाटू लागला.
दिल्ली: शेख हसीना यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. आई-वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतर त्यांनी निर्वासितासारखं आयुष्य काढलं. राजकारणातही त्यांनी अनेकदा हार पचवली; मात्र 2009 पासून त्या पंतप्रधानपदावर कायम होत्या.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. टीव्ही रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना राजधानी ढाका सोडून फिनलँडला जात असल्याचं समजतंय. त्यांच्या पक्षाचे काही वरिष्ठ नेतेही देश सोडणार असल्याचं वृत्त आहे. आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या विरुद्ध हिंसक आंदोलन व संघर्ष सुरू होता. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आंदोलकांशी कठोरतेनं वागवण्यास सुरुवात केली, तेव्हा प्रकरण आणखी चिघळलं. आंदोलक शेख हसीना यांच्या राजीनाम्यावर अडून बसले व सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू केलं.
advertisement
शेख हसीना यांचा जीवनप्रवास
शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी झाला. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची ती सर्वांत मोठी मुलगी. त्यांचं बालपण पूर्व बंगालमधल्या तुंगीपाडा इथं गेलं. तिथेच त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर काही काळ त्या सेगुनबाहीचा इथं राहिल्या. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब बांगलादेशच्या राजधानीचं शहर असलेल्या ढाकामध्ये स्थलांतरित झालं.
advertisement
राजकारणात प्रवेश
शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात रस नव्हता. 1966 मध्ये ईडन महिला महाविद्यालयात शिकत असताना त्यांना राजकारणात रस वाटू लागला. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या आवामी लीग पक्षाचं काम सांभाळण्याचा निर्णय घेतला. युनिव्हर्सिटी ऑफ ढाकामधल्या विद्यार्थी राजकारणातही त्या सक्रिय होत्या.
advertisement
आई-वडील व भावंडांची हत्या
शेख हसीना यांच्या जीवनात 1975 साली भूकंप झाला. बांगलादेशच्या लष्करानं बंड केलं व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारलं. सशस्त्र सैनिकांनी शेख हसीना यांची आई, वडील शेख मुजीबुर रेहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्या वेळी शेख हसीना त्यांचे पती वाजिद मियाँ आणि छोट्या बहिणीसोबत युरोपमध्ये होत्या. त्यामुळे त्या हल्ल्यातून वाचल्या. त्यानंतर काही काळ हसीना जर्मनीमध्ये राहिल्या. नंतर इंदिरा गांधी सरकारनं त्यांना भारतात आश्रय दिला. शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत दिल्लीमध्ये आल्या व सहा वर्षं राहिल्या.
advertisement
शेख हसीना 1981 मध्ये बांगलादेशात परतल्या. त्या विमानतळावर पोहोचल्या तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी लाखो नागरिक उपस्थित होते. बांगलादेशात परतल्यावर वडिलांचा पक्ष विस्तारण्याचा त्यांनी विचार केला. 1986मध्ये पहिल्यांदा त्या सर्वसाधारण निवडणुकीत उतरल्या; मात्र त्यांना हार पत्करावी लागली. त्या विरोधी पक्षनेत्या म्हणून निवडल्या गेल्या. 1991 मध्ये एक प्रकारे पहिल्यांदाच बांगलादेशात स्वतंत्रपणे निवडणुका झाल्या. त्यात हसीना यांच्या आवामी लीग पक्षाला बहुमत मिळालं नाही. खालिदा झिया यांचा विरोधी पक्ष सत्तेत आला.
advertisement
1996मध्ये पुन्हा झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला मोठं बहुमत मिळालं व शेख हसीना पंतप्रधान बनल्या. 2001मधल्या निवडणुकीत पुन्हा त्यांचा पक्ष हरला. 2009 मध्ये पुन्हा सत्तेत आला व तेव्हापासून त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या.
शेख हसीना या दोन वेळा मरता मरता वाचल्या आहेत. पहिल्यांदा 1975 साली आणि दुसऱ्यांदा 2004 साली. 1975 मध्ये त्यांच्या कुटुंबाची हत्या झाली, तेव्हा त्या देशाबाहेर असल्यामुळे वाचल्या. 2004 मध्ये त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला झाला; त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2024 5:44 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
Sheikh Hasina: आई-वडील आणि 3 भावांची हत्या, 2 वेळा मृत्यू चुकवला; शेख हसीना यांच्याबद्दल न ऐकलेली स्टोरी!