पहिले 10-20 वर्ष: हळूहळू सिस्टिम कोसळू लागेल
सुरुवातीला काही फारसा फरक जाणवणार नाही. लोक रोजच्याप्रमाणे कामावर जातील, शाळा सुरू असतील, रुग्णालयं चालू असतील. पण जसजशी वृद्ध माणसं मरू लागतील आणि नवं बाळ जन्माला येणार नसेल, तसतशी तरुण लोकसंख्या घटू लागेल. शेती करणारे, फॅक्टऱ्यांमध्ये यंत्र चालवणारे, डॉक्टर, इंजिनीयर आणि स्वच्छता कर्मचारी – हे हळूहळू कमी होत जातील. आणि तेव्हा समाजाची मूलभूत व्यवस्था हादरू लागेल.
advertisement
30-50 वर्षांनंतर: यंत्रणा कोसळण्यास सुरुवात
युवा लोकसंख्या नसल्यामुळे शेती, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था अशा सेवा मोडकळीस येतील. अन्नटंचाई निर्माण होईल, औषधं मिळणं कठीण होईल आणि स्वच्छ पाण्याचाही प्रश्न निर्माण होईल. म्हणजेच लोकसंख्या जरी घटत असली तरी संसाधनांचं व्यवस्थापन पूर्णतः कोसळेल. नवीन तंत्रज्ञान निर्माण होणार नाही, आजारांचं उपचार होणार नाही आणि लोक एकाकीपणा व अव्यवस्थेच्या गर्तेत अडकतील.
70-80 वर्षांनंतर: शेवटाची सुरुवात
त्या वेळी मोजक्याच शहरांमध्ये थोडे वृद्ध लोक शिल्लक असतील. कुठलीही नवीन पिढी अस्तित्वात नसेल. जनरेशन गॅप नव्हे, तर संपूर्ण जनरेशनच गायब होईल. आणि तेव्हा, जसं निएंडरथल मानव इतिहासजमा झाले तसंच ‘होमो सेपियन्स’ म्हणजे आपणही होऊन जाऊ.
हे असं का होऊ शकतं?
ही कल्पना भयावह वाटेल, पण विज्ञान त्याला पूर्णपणे नाकारत नाही. काही संभाव्य कारणं:
-एखादी जागतिक आजार जो माणसांना वंध्य करेल (जसं कर्ट वोनगुट यांच्या ‘Galapagos’ कादंबरीत सांगितलं आहे)
-अणूयुद्ध, ज्यामुळे पृथ्वीवरचं जीवन संपेल
-किंवा लोक स्वतःहून मूल न जन्मवण्याचा निर्णय घेतील
जन्मदरात घट: आजपासूनच सुरू
जपान, दक्षिण कोरिया सारख्या देशांमध्ये जन्मदर चिंताजनकरीत्या घसरत आहे. भारतातही अनेकजण कमी मूलांना जन्म देत आहेत, काही तर घेतच नाहीत. अमेरिका मध्ये 2024 मध्ये 3.6 दशलक्ष बाळं जन्मली, जी संख्या 20 वर्षांपूर्वी 4.1 दशलक्ष होती. त्याच वेळी मृत्यूसंख्या वाढते आहे: 2022 मध्ये 3.3 दशलक्ष. जर हे ट्रेंड्स सुरूच राहिले आणि स्थलांतर (immigration) कमी झालं, तर लोकसंख्या सतत घटत जाईल.
तरुण वि. वृद्ध: सामाजिक असंतुलनही वाढेल
तरुण समाजाची पाठिशी असतात. तेच नवीन कल्पना आणतात, तंत्रज्ञान बनवतात आणि वृद्धांची काळजी घेतात. जर तरुणांची संख्या कमी झाली तर वृद्धांचं आयुष्यही धोक्यात येईल. एक वेळ अशी येईल की काळजी घेणारा कुणीच नसेल, ना व्यवस्थाच उरेल.
मानवजातीचं अस्तित्व: एक तात्पुरता चमत्कार?
आपले पूर्वज होमो सेपियन्स गेली सुमारे 2 लाख वर्ष पृथ्वीवर आहेत. पण आपले नातेवाईक निएंडरथल 40,000 वर्षांपूर्वी लुप्त झाले – कारण ते संसाधनांचं व्यवस्थापन करू शकले नाहीत आणि त्यांच्या प्रजननदरात घट झाली. जर आजचे बर्थ ट्रेंड्स, जागतिक हवामान बदल, युद्ध आणि महामारी असेच चालू राहिले, तर मानवजातीचं अस्तित्व संपणार, ही कल्पनाच नाही – ती शक्यता आहे.