हे कृत्रिम लाल रक्तपेशी 250 नॅनोमीटर एवढ्या छोट्या लिपिड झिल्लीमध्ये बंदिस्त असतात. नैसर्गिक रक्ताच्या तुलनेत याचा जांभळा रंग हे विशेष लक्षण आहे.
सार्वत्रिक सुसंगतता आणि सुरक्षितता
HbVs चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व रक्तगटांसाठी सुसंगतता. यामध्ये कोणतेही रक्तगट चिन्ह नसल्यामुळे हे कोणत्याही व्यक्तीमध्ये सुरक्षितपणे चढवता येते. मग तो A, B, AB किंवा O गटाचा असो. त्यामुळे रक्तगट तपासणीची गरजच नाही.
advertisement
याशिवाय हे रक्त कोणत्याही विषाणूंनी मुक्त आहे. HIV, हेपेटायटिससारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका नाही. याचे शेल्फ-लाइफ म्हणजेच साठवण्याची मुदत दोन वर्षांपर्यंत असून नैसर्गिक रक्ताच्या 42 दिवसांच्या तुलनेत ही मोठी सुधारणा आहे.
तसेच, HbVs मुदत संपलेल्या रक्तातूनही तयार करता येतात. ज्यामुळे रक्ताची नासाडी टाळता येते आणि तरीही ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य सक्षमपणे करता येते.
नाविन्यपूर्ण संशोधन आणि उत्पादन
हे कृत्रिम रक्त प्रोफेसर हिरोमी साकाई आणि त्यांची टीम (नारा मेडिकल युनिव्हर्सिटी, जपान) यांनी तयार केले आहे. यामध्ये कालबाह्य रक्तातून हेमोग्लोबिन काढून त्याचे नॅनो आकाराच्या लिपिड झिल्लीमध्ये बंदिस्त करून हे रक्त तयार केले जाते. सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक शुद्धीकरण पद्धती वापरण्यात आल्या आहेत.
HbVs का ठरते ‘गेम चेंजर’
जागतिक तुटवड्याला उत्तर: WHO च्या मते दरवर्षी जगभरात 11.2 कोटी युनिट रक्तदान केले जाते. तरीही मागणीपेक्षा पुरवठा कमीच असतो. आपत्कालीन शस्त्रक्रिया, अपघात किंवा प्रसूतीवेळी हे कृत्रिम रक्त त्वरित जीव वाचवू शकते.
वाहतुकीस सोपे: हे रक्त सहज कुठेही पोहोचवता येते. लष्करी ऑपरेशन, आपत्ती निवारण किंवा मोबाइल रुग्णालये यांसाठी उपयुक्त.
गट तपासणीची गरज नाही: यामुळे वैद्यकीय निर्णय घेण्याचा वेग वाढतो.
आवश्यक शस्त्रक्रिया, अंग प्रत्यारोपण वा रक्तस्रावाच्या प्रसंगी: अशा वेळी हे त्वरित उपलब्ध करून जीव वाचवण्यास मदत होते.
संसर्गाचा धोका नाही: विषाणूमुक्त असल्यामुळे ज्या भागांमध्ये रक्त सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तिथे याचा विशेष उपयोग होईल.
चाचण्या आणि भविष्यातील शक्यता
प्रारंभी उंदरांवर झालेल्या चाचणीत त्यांच्या शरीरातील 90% रक्त HbVs ने बदलूनही त्यांचे जीवनसत्त्व सामान्य राहिले. 2020 पासून मानवी चाचण्या सुरू झाल्या. त्यामध्ये 10 मि.ली., 50 मि.ली., 100 मि.ली. डोस देण्यात आले आणि 2025 पर्यंत 100 मि.ली. ते 400 मि.ली. डोसपर्यंत पोहोचले तेही कुठलेही गंभीर दुष्परिणाम न आढळता.
2030 पर्यंत हे रक्त मोठ्या प्रमाणात तयार करून जागतिक पातळीवर वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र गरिब देशांपर्यंत हे स्वस्तात पोहोचवणे, तसेच नियामक मान्यता मिळवणे हे आव्हान ठरणार आहे.
रक्तबँकांवरील अवलंबन होणार कमी
जर हे कृत्रिम रक्त यशस्वी ठरले तर पारंपरिक रक्तदानावर अवलंबन मोठ्या प्रमाणात कमी होईल. विशेषतः विकासशील देशांमध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी असल्यामुळे हे अनेकांचे प्राण वाचवू शकते.
आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, लष्करी वैद्यकीय सेवेतील उपयोगामुळे आरोग्य सेवांचा दर्जा आणि वेग वाढेल – यामुळे संपूर्ण जगात वैद्यकीय क्रांती होऊ शकते.