चिनी रेडिओने मूसाला दिला दगा
हाशिम मूसा आपल्या पाकिस्तानी आक्यांशी संपर्क साधण्यासाठी ‘अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी’ चिनी रेडिओ सेटचा वापर करत होता. दावा होता की हे उपकरण पकडता येत नाही. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याची सिग्नल ट्रॅक करताच मूसा आणि त्याच्या टोळीचा ठाव घेतला. दाचीगाम नॅशनल पार्कजवळ या रेडिओ सेटचा वापर झाल्याचे संकेत मिळाल्यानंतर कारवाईची रूपरेषा आखण्यात आली.
advertisement
महादेव पीकवर अचूक कारवाई
जिथे चकमक झाली ते महादेव पीक अतिशय दुर्गम आणि उंच ठिकाण आहे. जिथे पोहोचण्यासाठी तब्बल 16 किमी पायपीट करावी लागते. रविवारी रात्री 2 वाजता मूसा आणि त्याच्या टोळीने पुन्हा रेडिओ सेटद्वारे पाकिस्तानशी संपर्क साधला आणि त्याच वेळी त्यांच्या हालचाली गुप्तचर यंत्रणांनी टिपल्या. लगेचच त्या परिसरातील सर्व मार्ग बंद करून सुरक्षा दलांनी घेराव टाकला आणि अचूक कारवाईत तिघांनाही ठार केलं.
स्थानीय नेटवर्कही गप्पच!
मूसा कश्मीरमध्ये आपला एक ओव्हरग्राउंड नेटवर्क चालवत होता. मात्र या वेळी सुरक्षा दलांनी इतकी गुप्त आणि अचूक कारवाई केली की त्याच्या स्थानिक मदतनीसांनाही याचा पत्ताच लागला नाही. चकमकीनंतर मिळालेल्या वस्तू आणि रेशनवरून त्याचा स्थानिक गावांशी संबंध असल्याचंही उघड झालं असून आता त्याच्या सहकार्यांवर छापे टाकण्याचे काम सुरू आहे.
दहशतवाद्यांवर निर्णायक घाव
लिडवास परिसरात भारतीय सैन्य, जम्मू-कश्मीर पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाने 'ऑपरेशन महादेव' राबवलं. या मोहिमेत मोठं यश मिळवत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही चकमक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. ज्यात सुरक्षादलांनी कोणतीही ढील न देता दहशतवाद्यांना ठार केलं.
पहलगाम हल्ला
22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन मैदानात पाकिस्तान समर्थित लश्कर-ए-तैयबा दहशतवाद्यांनी टूरिस्टांवर हल्ला करत 26 पर्यटकांची धर्म विचारून निर्घृण हत्या केली होती. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्य दलांना मुक्त हात दिला आणि त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या आत दहशतवादी तळांवर थेट हल्ले करून नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली.
