मुंबईजवळच्या कर्जत (नेरळ) परिसरात एका बिल्डरने ‘हलाल लाइफस्टाइल टाउनशिप’ किंवा ‘हलाल अपार्टमेंट’ नावाचा एक नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या जाहिरातीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही गृहनिर्माण संस्था केवळ मुस्लिम समुदायासाठी घरे आणि सुविधा पुरवेल. यावरून धार्मिक आधारावर भेदभाव केला जात असल्याचा आरोप होत असून, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
advertisement
या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) घेतली आहे. हलाल कॉलनी किंवा हलाल अपार्टमेंटची ही संकल्पना भारतीय संविधानातील समानता आणि भेदभावापासून संरक्षणाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा वाद निर्माण झाला आहे.
राजकीय प्रतिक्रिया आणि मानवाधिकार आयोगाची नोटीस
या जाहिरातीच्या उद्देशावर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती मागे घेण्याची मागणी केली आहे. भाजप आणि इतर राजकीय पक्षांनीही यावर टीका केली आहे. एनएचआरसीने महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव यांना मानवाधिकार संरक्षण कायदा, 1993 च्या कलम 12 अंतर्गत नोटीस बजावली आहे. या प्रकल्पाला कोणत्या कायदेशीर आधारावर परवानगी देण्यात आली, याचा अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
'हलाल' म्हणजे काय?
'हलाल' हा एक अरबी शब्द असून, त्याचा अर्थ 'वैध' किंवा 'जायज' असा होतो. इस्लाम धर्मामध्ये ज्या गोष्टी, कृती किंवा पदार्थ शरीयतनुसार योग्य आणि स्वीकारार्ह आहेत, त्यांना 'हलाल' मानले जाते. यामध्ये खाण्यापिण्यापासून ते आर्थिक व्यवहार, कपडे आणि औषधांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. सर्वात जास्त वापर 'हलाल' हा शब्द खाण्यापिण्यासाठी केला जातो, जसे की 'हलाल मीट'.
'हलाल' घर किंवा कॉलनीची संकल्पना
'हलाल' घर किंवा कॉलनी म्हणजे असे गृहनिर्माण प्रकल्प- जे विशेषतः मुस्लिम समुदायाच्या धार्मिक गरजा आणि 'हलाल' जीवनशैली लक्षात घेऊन डिझाइन केले जातात. या कॉलनींचा उद्देश असा आहे की- मुस्लिम कुटुंबांना असे वातावरण मिळावे जिथे इस्लामी कायदे, आहार आणि इतर धार्मिक परंपरांचे पालन सहज करता येईल.
अशा वसाहतींमध्ये सामान्यतः मशीद, इस्लामिक शाळा, हलाल प्रमाणित खाद्यपदार्थांची व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी सुविधा केंद्रे आणि दारू किंवा इस्लाममध्ये निषिद्ध असलेल्या इतर वस्तूंवर बंदी असू शकते.
इतर देशांतील 'हलाल' प्रकल्प
काही मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये आणि पाश्चिमात्य देशांतील मुस्लिम समुदायांमध्ये या संकल्पनेवर आधारित काम झाले आहे.
मलेशिया आणि इंडोनेशिया : येथे “हलाल लाइफस्टाइल हाउसिंग” प्रकल्प सुरू झाले आहेत. मलेशियात हलाल पार्क आणि शाह आलम परिसरात असे हाउसिंग प्रकल्प आहेत. जिथे हलाल प्रमाणित फूड कोर्ट, मशिदी आणि इस्लामी बँकिंग सुविधा असतात.
संयुक्त अरब अमिरात आणि आखाती देश : येथे “शरिया-कंप्लायंट हाउसिंग” किंवा “इस्लामिक रेसिडेन्शियल टाउनशिप”च्या नावाने काही प्रकल्प आहेत. जिथे दारू, डुकराचे मांस, नाईट क्लब अशा गोष्टी नसतात.
ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया : येथे मुस्लिम प्रवासी समाजाने हलाल लाइफस्टाइल हाउसिंग सोसायट्यांची मागणी केली आहे. येथे लहान कॉलनी/सोसायटी तयार झाल्या आहेत. ज्यात हलाल अन्न, वेगळे जिम-स्विमिंग पूल आणि इस्लामी नियमांप्रमाणे डिझाईन केलेली सुविधा असते. ब्रिटनमधील बर्मिंघम आणि ईस्ट लंडनमध्ये मुस्लिमांनी हलाल हाउसिंग कोऑपरेटिव्ह तयार केले आहे.
जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स : काही शहरांत मुस्लिम कम्युनिटी-बेस्ड प्रकल्प उभे राहिले आहेत. हे प्रकल्प इस्लामिक हाउसिंग कोऑपरेटिव्ह किंवा शरिया हाउसिंग फायनान्स स्कीम्सच्या स्वरूपात आहेत. उद्देश असा की मुस्लिम कुटुंबांना व्याज टाळून घरे विकत घेता येतील व हलाल नियमांनुसार राहता येईल.
मात्र युरोप-अमेरिकेत फक्त मुस्लिमांसाठी अपार्टमेंट असा मॉडेल कायद्याने मान्य नाही. कारण तेथील संविधान धर्म/जातीय आधारावर भेदभावाला परवानगी देत नाही.
भारतात वाद का?
भारतात 'हलाल' कॉलनीचा मुद्दा वादाचा विषय बनला आहे, कारण:
संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन: भारतीय संविधानानुसार, कोणतीही वसाहत किंवा गृहनिर्माण संस्था केवळ धर्म किंवा जातीच्या आधारावर मर्यादित असू शकत नाही. असे केल्यास ते कलम 14, 15, 19 आणि 21 चे उल्लंघन मानले जाऊ शकते.
सामाजिक विभाजन: काही संघटनांनी याला 'समांतर इस्लामी व्यवस्था' किंवा 'गेटोजायझेशन' असे म्हटले आहे, ज्यामुळे समाजात विभाजन वाढेल.
धार्मिक ब्रँडिंग: विरोधकांच्या मते, ही रिअल इस्टेटमधील धार्मिक ब्रँडिंग असून भारतासारख्या बहुधर्मीय देशासाठी हे एक धोकादायक उदाहरण ठरू शकते.
मुस्लिमांसाठी 'हलाल' नियमांची माहिती
मुस्लिम समुदायासाठी 'हलाल' नियम त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबींवर लागू होतात. 'हलाल' म्हणजे इस्लाममध्ये ज्या गोष्टींना परवानगी किंवा मान्यता आहे. या नियमांचे पालन करणे हे त्यांच्यासाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. 'हलाल' नियमांचा जीवनशैलीवर होणारा परिणाम खालीलप्रमाणे आहे:
1. आहार
हलाल: गाय, बकरी, मेंढी, उंट, कोंबडी आणि मासे यांना इस्लामी पद्धतीने 'झबह' (योग्य प्रकारे कापून) केलेले मांस हलाल मानले जाते. याशिवाय भाज्या, फळे, धान्य, दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ देखील हलाल आहेत.
हराम (निषिद्ध): डुक्कर आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, दारू आणि नशा आणणाऱ्या गोष्टी, रक्त किंवा रक्तापासून बनवलेले पदार्थ आणि नैसर्गिकरित्या मृत झालेल्या प्राण्याचे मांस हराम मानले जाते. काही औषधे, चॉकलेट्स, कँडी किंवा सौंदर्यप्रसाधने ज्यात अल्कोहोल किंवा प्राण्यांपासून बनवलेले घटक असतात, ती देखील हराम मानली जातात.
2. कपडे आणि पेहराव
हलाल: साधे आणि सभ्य कपडे घालणे हलाल मानले जाते. स्त्री आणि पुरुष दोघांनीही शरीर पूर्णपणे झाकणारे कपडे परिधान करणे आवश्यक आहे.
हराम: पुरुषांसाठी सोन्याचे दागिने आणि रेशमी कपडे हराम आहेत. पण महिलांना याची परवानगी आहे. जास्त भडक, अश्लील किंवा नग्नता दर्शवणारे कपडे देखील हराम आहेत.
3. कामकाज आणि कमाई
हलाल: प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केलेली कमाई (व्यापार, नोकरी, शेती किंवा इतर कोणताही व्यवसाय) हलाल आहे. तसेच, इस्लामी बँकिंग (ज्यात व्याज घेतले जात नाही) आणि व्याजमुक्त व्यवहार हे देखील हलाल मानले जातात.
हराम: कोणत्याही प्रकारचे व्याज घेणे किंवा देणे हराम आहे.
इतर महत्त्वाचे हलाल नियम:
-स्वच्छता राखणे हलाल आहे.
-दिवसातून पाच वेळा नमाज (प्रार्थना) करणे.
-रमजान महिन्यात रोजा (उपवास) ठेवणे.
-सक्षम असल्यास 'जकात' (गरजू लोकांना दान) देणे आणि 'हज' (मक्केची धार्मिक यात्रा) करणे.
हे सर्व नियम मुस्लिमांच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करतात. मग ते खाण्यापिण्याबद्दल असो, पेहरावाबाबत असो, कमाईबद्दल असो किंवा नातेसंबंध आणि सवयींबद्दल असो.