नवी दिल्ली: पुढील महिन्यात आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे. 7-8 सप्टेंबरच्या रात्री चंद्र तब्बल 82 मिनिटांसाठी रक्तासारखा लाल रंगाचा दिसेल. यालाच ‘ब्लड मून’ म्हणतात. हे या वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण असेल. विशेष म्हणजे हे दृश्य भारत, आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या भागात म्हणजेच जगातील सुमारे 77% लोकसंख्येला पाहता येईल. भारतात हे ग्रहण सर्वात स्पष्टपणे दिसेल.
advertisement
ब्लड मून: चंद्र लाल का दिसतो?
पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. तेव्हा सूर्याचा प्रकाश थेट चंद्रापर्यंत पोहोचत नाही. पण पृथ्वीचे वातावरण या प्रकाशाला वाकवून आणि गाळून चंद्रापर्यंत पोहोचवते. वातावरणातील लहान तरंगलांबीचा निळा आणि जांभळा प्रकाश विखुरला जातो. तर लांब तरंगलांबीचा लाल आणि नारंगी प्रकाश चंद्रावर पोहोचतो.
यामुळेच चंद्र लालसर दिसतो. या घटनेला ‘रेले स्कॅटरिंग’ (Rayleigh Scattering) असे म्हणतात. याच कारणामुळे सूर्योदय आणि सूर्यास्तावेळीही आकाश लाल दिसते.
नासाच्या मते चंद्र किती गडद लाल दिसेल हे त्या वेळी पृथ्वीच्या वातावरणावर अवलंबून असते. जर वातावरणात धूळ, धुके किंवा ज्वालामुखीची राख जास्त असेल तर लाल रंग अधिक गडद दिसू शकतो.
ब्लड मून कधी आणि किती वेळ दिसेल?
भारतात हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबरच्या रात्री सुरू होईल आणि 8 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत चालेल.
सुरुवात: रात्री 8:58 वाजता (7 सप्टेंबर)
ब्लड मून पीक (सर्वात गडद वेळ): रात्री 11:00 ते 12:22 पर्यंत
समाप्ती: पहाटे 1:25 वाजता (8 सप्टेंबर)
एकूण पाच तासांपेक्षा जास्त वेळ चालणाऱ्या या घटनेत चंद्र 82 मिनिटे पूर्णपणे लाल दिसेल.
भारतात कोणत्या शहरांमध्ये सर्वोत्तम दृश्य दिसेल?
हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. पण मोकळे आकाश आणि स्वच्छ हवामान असलेल्या शहरांमध्ये हे दृश्य अधिक विलोभनीय असेल. ‘ब्लड मून’ पाहण्यासाठी काही प्रमुख शहरे: मुंबई, दिल्ली, पुणे,कोलकाता, हैदराबाद, चंदीगढ
जर तुम्हाला हे दृश्य पाहायचे असेल तर घराच्या छतावर, मोकळ्या मैदानावर किंवा प्रदूषण आणि दिव्यांच्या प्रकाशापासून दूर असलेल्या ठिकाणी जावे.
ब्लड मून पाहण्यासाठी काही टिप्स
-लोक अनेकदा सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहणाबद्दलही सावधगिरी बाळगतात. मात्र चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
-दुर्बिण किंवा टेलिस्कोपचा वापर केल्यास चंद्राची पृष्ठभाग, खड्डे (क्रेटर) आणि लालिमा अधिक स्पष्ट दिसेल.
-छान फोटो काढण्यासाठी ट्रायपॉड आणि लॉंग एक्स्पोजर मोडचा वापर करावा.
- हवामानाचा अंदाज आधीच तपासा जेणेकरून आकाश निरभ्र असेल.
ब्लड मूनचे ऐतिहासिक महत्त्व
हा ब्लड मून खास आहे कारण तो खूप मोठ्या कालावधीसाठी असेल आणि मोठ्या भूभागातून दिसेल. त्यामुळे लाखो लोक एकाच वेळी या दृश्याचा भाग बनतील. इतिहासात अनेक संस्कृतींनी ब्लड मूनला शुभ-अशुभ संकेत मानले आहे. काही ठिकाणी त्याला बदलाचे प्रतीक मानले गेले, तर काही ठिकाणी धोक्याचा इशारा. आजच्या काळात याकडे विज्ञान आणि सौंदर्याच्या दृष्टीने पाहिले जाते. वैज्ञानिकही या काळात चंद्राच्या लालिमेचा अभ्यास करतात. ज्यामुळे पृथ्वीच्या वातावरणातील धूळ, प्रदूषण किंवा ज्वालामुखी राखेची माहिती मिळते.