तेलंगणाची राजधानी हैदराबाद हे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून इराणशी विशेष जोडलेलं आहे. या शहरात असे अनेक लोक आहेत. जे गेल्या 400 वर्षांपूर्वी इराणमधून भारतात आले आणि इथेच स्थायिक झाले. त्यांचे रहाण्याचे पद्धती, सण-उत्सव अजूनही इराणी परंपरेशी जुळणारे आहेत. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशातील कसोल, धर्मकोट यांना ‘मिनी इस्रायल’ म्हटलं जातं. मिझोराम राज्यालाही ‘छोटं इस्रायल’ असं म्हणतात.
advertisement
हैदराबादला "छोटं इराण" का म्हणतात?
हैदराबादला "छोटं इराण" असं म्हटलं जातं कारण इथली संस्कृती, खाद्यसंस्कृती, भाषा, स्थापत्यकला आणि समाज यामध्ये इराणी प्रभाव खोलवर रुळलेला आहे. येथे स्थायिक झालेल्या इराणी कुटुंबांनी त्यांच्या परंपरांचा वारसा आजतागायत जपला आहे. ज्यामुळे हैदराबादमध्ये एक खास इराणी रंग पाहायला मिळतो.
इराणहून आलेल्या व्यक्तीनं ठेवली होती हैदराबादची पायाभरणी
16व्या शतकात क़ुली क़ुतुब शहा यांचं राजघराणं इराणमधून दिल्लीला आलं होतं. तिथून दक्षिण भारतातील दख्खन परिसरात येऊन त्यांनी वास्तव्य केलं. याच घराण्यानं हैदराबाद शहराची स्थापना केली. त्यामुळे या शहराच्या संस्कृतीवर, स्थापत्यकलेवर, अन्नसंस्कृतीवर आणि भाषेवर इराणी प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
आज इथे स्थायिक झालेल्या अनेक इराणी कुटुंबांची तिसरी-चौथी पिढी स्वतःला 'पक्का हैदराबादी' मानते. पण त्यांनी त्यांच्या मूळ परंपरांशी नाळ अजूनही जोडून ठेवलेली आहे.
इराणी परंपरा जपणारे शिया मुस्लिम
हैदराबादमध्ये शिया मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. जी इराणी धार्मिक आणि सामाजिक परंपरा पाळते. मुहर्रमच्या काळात अशूरखाना, अंजुमन आणि मातम यांचा शिरकाव इथे दिसतो. जो इराणी पद्धतीशी मिळता-जुळता आहे. निजामांच्या काळात इराणहून आलेले अनेक शिया धर्मगुरू, कारागीर आणि व्यापारी येथे स्थायिक झाले होते. जुन्या शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही इराणी ताजियादारी आणि महफिली भरतात.
घराघरात फारसी आणि इराणी खाद्यसंस्कृती
हैदराबादमध्ये इराणी चहा आणि बिर्याणी खूपच प्रसिद्ध आहे. येथे अनेक रेस्टॉरंट्स आणि कॅफे इराणी शैलीतले अन्न आणि चहा देतात. अनेक इराणी कुटुंबं अनेक पिढ्यांपासून इथे स्थायिक असून, त्यांनी फारसी भाषा, इराणी अन्न आणि संस्कृती आजही जिवंत ठेवली आहे.
हैदराबादचं वास्तुशिल्प इराणच्या शहरावर आधारित
हैदराबादच्या स्थापत्यावर इराणमधील शिराझ शहराचा प्रभाव आहे. क़ुतुब शाही आणि निजामांच्या काळात इराणहून वास्तुविशारद, धर्मगुरू आणि अभियंते बोलावले जायचे. इतिहासकारांच्या मते, हैदराबादचं आराखडा मध्य इराणमधील इस्फहान प्रांतावर आधारित आहे. फारसीमध्ये हैदराबादचं उच्चारणही ‘हेदराबाद’ असं केलं जातं.
राज्य ज्याला "छोटं इस्रायल" म्हणतात
हिमाचल प्रदेशातील दोन गावांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने इस्रायली पर्यटक येतात की त्या ठिकाणी 'मिनी इस्रायल' म्हटलं जातं. पण त्याआधी भारतात एक राज्य असं आहे. ज्याला 'छोटं इस्रायल' असं म्हटलं जातं – आणि ते म्हणजे मिझोराम.
मिझोराममध्ये राहणारे लोक आणि त्यांची ज्यू परंपरा
मिझोराम राज्यात 'बनेई मेनाशे' (Bnei Menashe) नावाचा एक समुदाय राहतो. जो स्वतःला इस्रायलच्या हरवलेल्या 10 जमातींपैकी एकाचा वंशज मानतो. या समुदायाचं म्हणणं आहे की ते ज्यू धर्माचे अनुयायी आहेत आणि अनेक पिढ्यांपासून ज्यू परंपरा पाळत आले आहेत. त्यांचा दावा आहे की, 722 ईसापूर्वी अॅसिरियन साम्राज्यानं इस्रायलवर आक्रमण केलं. तेव्हा त्यांचे पूर्वज निर्वासित झाले आणि मध्य-पूर्व, चीन मार्गे भारत-बर्मा सीमेजवळ स्थायिक झाले.
ज्यू ओळख
20व्या शतकात जेव्हा मणिपूर आणि मिझोराममध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बायबलचं भाषांतर स्थानिक भाषांमध्ये केलं. तेव्हा या समुदायाला त्यांच्या ज्यू मूळाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी ज्यू धर्माच्या परंपरा पुन्हा स्वीकारल्या. आजही बनेई मेनाशे समुदायातील लोक हिब्रू परंपरा, यहुदी सण आणि धार्मिक रीतिरिवाज भारतीय संस्कृतीसोबत पाळतात.
इस्रायल सरकारकडून मान्यता आणि वस्ती
2005 मध्ये इस्रायलचे सेफार्डी प्रमुख रब्बी श्लोमो अमर यांनी बनेई मेनाशेला "इस्रायलच्या हरवलेल्या जमाती"पैकी एक म्हणून औपचारिक मान्यता दिली. त्यानंतर इस्रायली रब्बिनेटच्या देखरेखीखाली या लोकांचं औपचारिक धर्मांतर करून त्यांना अलियाह (ज्यू स्थलांतर) साठी पात्र मानण्यात आलं. आतापर्यंत सुमारे 3,000 बनेई मेनाशे सदस्य इस्रायलमध्ये स्थायिक झाले आहेत. उरलेले सुमारे 7,000 लोक भारतात आहेत. जे भविष्यात इस्रायलमध्ये जाण्याची प्रतीक्षा करत आहेत.
कसोल आणि धर्मकोट – मिनी इस्रायलचे पर्यटन ठिकाण
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील कसोल आणि धर्मकोट या गावांना ‘मिनी इस्रायल’ म्हटलं जातं. 1990 च्या दशकापासून येथे मोठ्या प्रमाणात इस्रायली पर्यटक येत आहेत. आज या ठिकाणची संस्कृती, अन्न, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि रस्त्यांवरही इस्रायली प्रभाव स्पष्ट दिसून येतो. काही रेस्टॉरंट्समध्ये हिब्रू भाषेतील मेन्यू कार्डही दिले जातात. काही इस्रायली नागरिक तर येथे अनेक महिने राहतात.
धर्मकोटमध्ये चबाड हाऊस
हिमाचल प्रदेशातील काँगडा जिल्ह्यात धर्मशाळेजवळ वसलेलं धर्मकोट गावही ‘मिनी इस्रायल’ किंवा ‘पर्वतातलं तेल अवीव’ म्हणून ओळखलं जातं. येथेही इस्रायली पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या गावात एक चबाड हाऊस (ज्यू सामुदायिक केंद्र) देखील आहे. जिथे ज्यू पर्यटकांना घरासारखा अनुभव मिळतो.