पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता आठवडाभर चालणारी प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यामध्ये लोक त्यांचे अंतिम दर्शन घेऊ शकतील. प्रथम, सेंट मार्टा चॅपलमध्ये व्हॅटिकनचे अधिकारी आणि नंतर सेंट पीटर्समध्ये सामान्य लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. मात्र त्याचबरोबर नवीन पोपच्या निवडीची तयारीही सुरू झाली आहे.
पोप फ्रान्सिस दीर्घकाळापासून आजारी होते
फ्रान्सिस फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होते आणि तरुणपणी त्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना त्यांच्या फुफ्फुसाचा काही भाग काढावा लागला होता. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पोप यांना जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्याच्या या समस्येने नंतर 'डबल न्यूमोनिया'चे रूप धारण केले. त्यांच्या १२ वर्षांच्या पोपपदाच्या कार्यकाळात रुग्णालयात (दाखल) राहण्याचा हा सर्वात मोठा कालावधी होता. मात्र त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी गेल्या ईस्टर रविवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये हजारो लोकांना आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित होते आणि तेथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
advertisement
नवीन पोपची निवड कशी होईल?
पोप यांच्या मृत्यूनंतर किंवा पोप बेनेडिक्ट XVI यांच्यासारख्या दुर्मिळ राजीनामा प्रकरणात व्हॅटिकन एक पोप कॉन्क्लेव्ह (Pope conclave) बोलावते. ज्यामध्ये कार्डिनल्स कॉलेज (College of Cardinals) चर्चच्या पुढील प्रमुखाची निवड करण्यासाठी एकत्र येते. 22 जानेवारी 2025 पर्यंत कॉन्क्लेव्हच्या नियमांनुसार, 252 कार्डिनल्सपैकी 138 निर्वाचक आहेत. सिस्टिन चॅपलमध्ये गुप्त मतदानात फक्त 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक भाग घेऊ शकतात. सुमारे 120 लोक त्यांच्या निवडलेल्या उमेदवारासाठी गुप्तपणे मतदान करतील. त्यांचे नाव मतपत्रिकेवर लिहितील आणि ते एका भांड्यात ठेवतील. कोणत्याही उमेदवाराला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्यास, मतदानाची आणखी एक फेरी होईल. एका दिवसात जास्तीत जास्त चार फेऱ्या होऊ शकतात.
नवीन पोपसाठी मतदान करणारे भारतीय कार्डिनल कोण आहेत?
भारतात सध्या सहा कार्डिनल आहेत. त्यापैकी कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियस आणि कार्डिनल जॉर्ज एलेनचेरी हे 80 वर्षांचे आहेत आणि बाकीचे 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. नवीन पोपसाठी मतदान करणाऱ्या कार्डिनलमध्ये कार्डिनल फिलिप नेरी फेराओ, कार्डिनल क्लेमिस बेसिलियोस, कार्डिनल अँथनी पूला आणि कार्डिनल जॉर्ज जेकब कूवाकड यांचा समावेश असेल. उर्वरित दोन कार्डिनल जास्त वयामुळे नवीन पोपच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत.
यांना करता येणार मतदान
कार्डिनल फिलिप नेरी फेराओ (वय 72)- गोवा आणि दमणचे आर्चबिशप आणि ईस्ट इंडिजचे सातवे पॅट्रिआर्क आहेत. त्यांनी कौटुंबिक सेवा, आंतरधर्मीय संवाद आणि सामाजिक न्यायावर, विशेषतः स्थलांतरित आणि हवामान बदलावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना 28 ऑक्टोबर 1979 रोजी पुरोहित म्हणून, 10 एप्रिल 1994 रोजी बिशप म्हणून आणि 27ऑगस्ट 2022 रोजी कार्डिनल म्हणून नियुक्त करण्यात आले.
कार्डिनल क्लेमिस बेसिलियोस (वय 64)- मूळ नाव आयझॅक थोट्टुंकल आहे. ते सध्या सिरो-मलंकारा कॅथोलिक चर्चचे प्रमुख आर्चबिशप-कॅथोलिकोस आणि त्रिवेंद्रमचे प्रमुख आर्चबिशप म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 11 जून 1986 रोजी पुरोहित म्हणून, 15 ऑगस्ट 2001 रोजी बिशप म्हणून आणि 24 नोव्हेंबर 2012 रोजी कार्डिनल म्हणून नियुक्त करण्यात आले.
कार्डिनल अँथनी पूला (वय 63)- एक भारतीय धर्मगुरू आहेत. ज्यांनी गरीब मुलांना मदत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती जाती व्यवस्थेतील विषमता दूर करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल म्हणून पाहिले जाते. ते भारताचे पहिले दलित कार्डिनल आहेत.
कार्डिनल जॉर्ज जेकब कूवाकड (वय 51)- प्रशिक्षित व्हॅटिकन मुत्सद्दी आणि केरळमधील सिरो मलबार आर्चबिशप आहेत. त्यांनी 2021 पासून जानेवारी 2025 मध्ये आंतरधर्मीय संवादासाठी डिकॅस्ट्रीचे प्रीफेक्ट म्हणून नियुक्ती होईपर्यंत पोप फ्रान्सिस यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासांचे आयोजन केले होते. त्यांना 24 जुलै 2004 रोजी पुरोहित म्हणून, 24 नोव्हेंबर 2024 रोजी बिशप म्हणून आणि 7 डिसेंबर 2024 रोजी कार्डिनल म्हणून नियुक्त करण्यात आले.
गेल्या वेळी काय घडले?
2013 च्या पोप निवडणुकीत पोप फ्रान्सिस यांची नियुक्ती झाली होती. ज्यात भारतीय कार्डिनल टेलिस्फोर टोप्पो (पाटण्याचे आर्चबिशप), ओस्वाल्ड ग्रासियस (मुंबईचे आर्चबिशप), सायरो-मलबार आणि सायरो-मलंकारा चर्चचे प्रमुख मार जॉर्ज अलेन्चेरी आणि मार बेसेलिओस क्लीमिस आणि मुंबईचे माजी आर्चबिशप इव्हान डायस (रोमन कुरिया) यांनी मतदान केले होते.