अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांना कोणत्याही परिस्थितीत सद्दामला हटवायचेच होते. यासाठी ‘जनसंहाराचे शस्त्र’चे निमित्त बनवण्यात आले. अमेरिका इराकवर तुटून पडली आणि सद्दाम हुसेनला पकडून फाशी देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवर अमेरिका कधीच विजय मिळवू शकली नाही. सत्ता बदलूनही अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडत राहिले. अखेर अमेरिकेने आपले सर्व सैन्य इराकमधून मागे घेण्याचा निर्णय घेतला. आणि आता इराणबाबतही तसेच वातावरण तयार केले गेले की ते अणुबॉम्ब तयार करत आहे.
advertisement
हल्ल्यापूर्वी IAEA चा संशयास्पद अहवाल
इस्रायलने हल्ला करण्याआधी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) ने एका संदिग्ध अहवालात दावा केला की, इराणचे युरेनियम संवर्धन आता ‘हत्यार निर्माण होऊ शकेल’ अशा स्तरावर पोहोचले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तर थेट म्हटले की इराण ९ अणुबॉम्ब तयार करू शकतो आणि आम्ही त्याला अणुशक्ती म्हणून राहू देणार नाही. हीच भाषा डोनाल्ड ट्रम्प यांनीही वापरली. आणि त्याचे परिणामी अमेरिका युद्धात उतरली.
21 जूनच्या रात्री आणि 22 जूनच्या पहाटे अमेरिकेच्या बी-2 फायटर जेट्सनी इराणच्या तीन प्रमुख अणुउत्पादन केंद्रांवर – नतांज, इस्फहान आणि फोर्डो – बंकर बस्टर बॉम्ब टाकले. माध्यमांमध्ये दावा केला जात आहे की ही तीनही केंद्रे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत.
ट्रम्प अडचणीत?
अमेरिकेच्या या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिकेतही ट्रम्प यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने विचारले आहे की, संसदेची परवानगी न घेता ट्रम्प यांनी हल्ल्याचा आदेश कसा दिला?
दरम्यान चीनने अमेरिका इराकसारखीच चूक पुन्हा करत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. चीनच्या सरकारी 'सीजीटीएन' वेबसाईटवर प्रकाशित लेखात म्हटले आहे की, हे अमेरिकेचे हल्ले एक अत्यंत धोकादायक वळण दर्शवतात. इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे की, पाश्चिमात्य आशियात लष्करी हस्तक्षेपाचे अनेकदा अनपेक्षित परिणाम होतात – जसे की दीर्घकालीन संघर्ष आणि प्रचंड अस्थिरता.
इराणचे प्रत्युत्तर?
आता प्रश्न असा निर्माण होतो की, इराण यावर गप्प बसेल का? सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, खरी लढाई आता सुरू झाली आहे. अमेरिका जिथे जाईल तिथे आमचे हल्ले होतील.
खाडीमध्ये सऊदी अरब, यूएई, बहरीन आणि जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैनिकी तळांवर इराण सहजपणे मिडियम-रेंज क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करू शकतो. जर इराणने प्रतिहल्ला केला, तर अमेरिकेसमोर एक दीर्घ आणि क्लिष्ट युद्ध उभे राहील.
संयुक्त राष्ट्रसंघाची चिंता
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनीओ गुतारेस यांनी इराणच्या अणु केंद्रांवर अमेरिका केलेल्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, या संघर्षाच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम सामान्य नागरिकांवर, संपूर्ण क्षेत्रावर आणि जगावर अत्यंत विनाशकारी ठरू शकतात.
गुतारेस यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, मी सर्व सदस्य देशांना आवाहन करतो की ते तणाव कमी करण्यासाठी पुढे यावेत. या परिस्थितीचे कोणतेही लष्करी समाधान नाही. मार्ग काढायचा असेल तर तो केवळ संवादातूनच शक्य आहे.