चित्रपट असो, मालिका असो, किंवा दवाखान्यातील प्रत्यक्ष अनुभव... प्रत्येक वेळी बाळ जन्म घेताच रडतं. जणू काही ते या नव्या जगात आल्याची घोषणाच करतं. खरंतर यामागे जन्म आणि जीवनाच्या या पहिल्या अद्भुत क्षणामागील विज्ञान आहे जो खूपच मनोरंजक आहे.
गर्भाशयात बाळ सुमारे नऊ महिने ऍम्निऑटिक फ्लुइड (Amniotic Fluid) नावाच्या एका नियंत्रित, सुरक्षित आणि उबदार वातावरणात राहतं. या काळात त्याचे फुफ्फुस (Lungs) द्रवाने भरलेले असतात आणि त्याला खऱ्या अर्थाने श्वास घ्यावा लागत नाही. बाळाच्या ऑक्सिजनची गरज नाळेतून पूर्ण होते ही आईशी जोडलेली असते. पण जेव्हा बाळ आईच्या गर्भातून बाहेर येतं, तेव्हा परिस्थिती क्षणार्धात बदलते.
advertisement
पहिला श्वास, पहिलं रडणं (science behind the first breath of a newborn)
बाहेरच्या जगात येताच बाळाला पहिल्यांदाच हवा लागते आणि ही हवा फुफ्फुसांमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करते. हा पहिला श्वास इतका मोठा असतो की, फुफ्फुसांमध्ये हवा भरल्यामुळे जो दाब निर्माण होतो, त्यामुळे फुफ्फुसांमधील लहान हवेच्या पिशव्या, ज्यांना 'अल्व्हिओलाई' (Alveoli) म्हणतात, त्या आपोआप उघडतात आणि विस्तारतात. हे पहिल्यांदा फुफ्फुस काम करत असल्याचं चिन्ह आहे. म्हणून तर बाळ जेव्हा रड जन्म घेतं, याचा अर्थ बाळ निरोगी आणि एकदम हेल्दी असल्याचं मानलं जातं.
वैद्यकीय भाषेत, डॉक्टर याला नवजात बाळाच्या जीवनातील पहिली "सिस्टम ऑन" मोमेंट म्हणतात. हे रडणं म्हणजे कोणत्याही भावनांचा किंवा वेदनेचा नव्हे, तर बाळाच्या शरीरातील नवीन श्वासोच्छ्वास प्रणाली सुरू झाल्याचा एक मोठा आणि स्पष्ट संकेत असतो. विशेष म्हणजे, बहुतेक शास्त्रज्ञांच्या मते, जन्म घेताना बाळाला कोणताही मोठा शारीरिक त्रास किंवा वेदना होत नाही.
बाळाच्या रडण्याला केवळ फुफ्फुसांचा विस्तारच नाही, तर बाहेरील वातावरणाचा 'शॉक' देखील कारणीभूत असतो. आईच्या गर्भाशयाचं तापमान साधारण 37 अंश सेल्सियस इतकं स्थिर आणि उबदार असतं. बाहेर येताच बाळ एका तुलनेने थंड, अधिक प्रखर प्रकाश असलेल्या आणि गोंगाट असलेल्या जगात येतं. तापमानातील हा अचानक बदल, तीव्र प्रकाशाची जाणीव, हवेचा स्पर्श, नवीन गुरुत्वाकर्षण आणि आवाज हे सारे अनुभव बाळासाठी एकदम नवे आणि धक्कादायक असतात. हे सगळं बाळाला रडण्यास प्रवृत्त करतं.
जन्म झाल्यावर बाळ लगेच रडणे, हे डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक लक्षण असते. बाळाचं रडणं म्हणजे त्याची श्वासोच्छ्वास प्रणाली व्यवस्थित कार्यरत झाली आहे. डॉक्टर जन्म झाल्यावर बाळाच्या आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी जी वैज्ञानिक पद्धत वापरतात, तिला 'ऍपगार स्कोअर' म्हणतात. या स्कोअरमध्ये बाळ किती सक्रिय आहे आणि ते लगेच रडलं की नाही, हा एक महत्त्वाचा 'पॅरामीटर' असतो.
जर बाळ लगेच रडलं नाही किंवा श्वास घेतला नाही, तर डॉक्टर हळूवारपणे त्याची पाठ थोपटतात किंवा पायाला स्पर्श करतात, जेणेकरून श्वसन प्रणाली सक्रिय होईल.
बाळाचा अगदी शांतपणे जन्म होऊ शकतो का? (Can a baby born breathing normally without crying?)
होय, काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये बाळ न रडताही जन्म घेऊ शकतं आणि ते पूर्णपणे सामान्य असू शकतं. जर बाळ शांत असेल, पण श्वासोच्छ्वास व्यवस्थित घेत असेल. जर त्याची त्वचा गुलाबी असेल आणि शरीर सक्रिय दिसत असेल, तर डॉक्टर थोडा वेळ त्याची बारकाईने तपासणी करतात आणि मग त्याला सामान्य मानले जाते. मात्र, जर बाळ अजिबात रडत नसेल आणि श्वासही घेत नसेल, तर त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते.
हसणारा बाळ जन्माला येतं का?
तुम्हाला जगाच्या इतिहासात एकाही अशा बाळाची नोंद सापडणार नाही, जे जन्मताच खरोखर मनमुराद हसलं असेल. यामागे वैज्ञानिक कारण आहे.
हसणे ही एक अत्यंत जटिल 'न्यूरोलॉजिकल' प्रक्रिया आहे. 'लाफ्टर कॉर्टेक्स', सामाजिक प्रतिसाद, चेहऱ्याच्या स्नायूंचा समन्वय, हे सर्व जन्म घेतलेल्या बाळाच्या मेंदूत (Brain) लगेच विकसित झालेले नसतात. नवजात बाळाचा मेंदू हसण्याइतका परिपक्व नसतो.
म्हणूनच, बाळाचं रडणं हा कोणताही वेदनेचा किंवा दुःखाचा टाहो नसून, या जगात त्याने घेतलेला पहिला विजय आहे. हा जीवनाचा पहिला 'सिस्टम ऑन' मोमेंट आहे, जो त्याच्या निरोगी आयुष्याचा सर्वात स्पष्ट आणि महत्त्वाचा संकेत आहे.
