नेमकी घटना काय?
डोंबिवली पूर्वेकडील सागाव, चेडा नगर भागात जय भारत स्कूलजवळ रविकिरण सोसायटी (राज अपार्टमेंट) ही इमारत आहे. आज पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्व रहिवासी गाढ झोपेत होते, तेव्हा इमारतीच्या बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगमध्ये अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांनी पेट घेतला.
advertisement
२९ दुचाकींचा कोळसा, ५ रहिवासी जखमी
या भीषण आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २९ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीचा भडका इतका मोठा होता की, त्यामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर साचला. जीव वाचवण्यासाठी रहिवासी सैरावैरा धावू लागले. या धावपळीत आणि आगीच्या झळा लागल्याने पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग इमारतीच्या वरील मजल्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात यश आले. पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व नागरिक भीतीने इमारतीबाहेर मोकळ्या जागेत जमा झाले होते.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पंचनामा सुरू असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
