चिकन आणि मटण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत तशी वेगळी. वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. त्यात मसालेही वेगवेगळे असतात पण आम्ही तुमच्यासाठी असे प्रकार आणले आहेत ज्यांची नावंही हटके आहेत. कदाचित त्यापैकी तुम्ही कधी ऐकलीही नसतील. आता बिलकुल वेळ न घालवता थेट या रेसिपींकडे वळुयात.
Mutton Recipe : अचानक पाहुणे आले; कोणत्याही तयारीशिवाय असे झटपट बनवा मटण-वडे
advertisement
चिकन अंगारा
काही लग्नांमध्ये हा पदार्थ बनवला जातो, अशी माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे. गॅसवर तवा ठेवून त्यात धने, जिरं, लवंग, काळी मिरी, सुकी लाल मिरची, वेलची टाकून थोडं परतून घ्या. मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्या. आता कांदे उभे चिरून तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत डीप फ्राय करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये घेऊन त्यात टोमॅटो टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या.
आता चिकन घेऊन त्यात मीठ, आलं-लसूण पेस्ट, तयार केलेला मसाला, कांदा-टोमॅटो पेस्ट, कसुरी मेथी, दही, थोडासा लाल कलर टाकून मिक्स करून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून त्यात हे चिकन टाका. तीव्र आचेवर 5 मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून 20 मिनिटं शिजवून घ्या. शेवटी चिकनमध्ये एक छोटी वाटी ठेवून त्यात कोळसा आणि त्यावर तूप टाकून झाकण ठेवून एक मिनिटं ठेवा. चिकन अंगारा तयार.
चिकन ठेचा
आजवर तुम्ही मिरचीचा ठेचा खाल्ला आहे पण चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? गॅसवर पॅन ठेवून त्यात शेंगदाणे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून परतून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरं, कढीपत्ता आणि कांदा उभा चिरून टाकून तो लाल होईपर्यंत परता. त्यात चिकन आणि तयार केलेला ठेचा टाकून चांगलं शिजवून घ्या.
कोथिंबीर टाकून सर्व्ह करा चिकन ठेचा.
मटण चुक्का
कुकरमध्ये मटण, हळद, आलं-लसूण पेस्ट आणि थोडं पाणी टाकून चांगलं शिजवून घ्या. धने, जिरे, बडीशेप, दालचिनी, लवंग, सुकी लाल मिरची, वेलची सगळं पॅनमध्ये हलके गरम करून त्याची पूड बनवून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, थोडं मीठ टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
आता यात शिजवलेले मटण, तयार केलेला मसाला आणि थोडं पाणी टाकून झाकण न ठेवता मसाल्याचा रंग बदलेपर्यंत शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
गोंगुरा चिकन
हे नाव तर तुम्ही कधी ऐकलंच नसेल. एका पॅनमध्ये थोडं तेल घ्या. थोडं गरम झालं की त्यात सुकी लाल मिरची, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकून तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आलं लसूण पेस्ट आणि हळद, मीठ टाकून परतून घ्या. आता टोमॅटो टाका. थोडं परतल्यानंतर लाल तिखट आणि धनेपूड टाका. परतून त्यात चिकन अॅड करा आणि गोंगुराचा पाला टाका.
आता गोंगुरा म्हणजे काय तर अंबाड्याची पालेभाजी ही एक दाक्षिणात्य भाजी आहे, पण ती तुम्हाला महाराष्ट्रातही मिळेल. सगळं एकत्र करून थोडं पाणी टाकून झाकण टाकून शिजवून घ्या. शेवटी गरम मसाला टाकून परतून घ्या. गोंगुरा चिकन तयार.
चिकन चंगेझी
चिकनला हळद, मसाला, मीठ, लिंबू रस आणि दही लावून मॅरिनेट करून बाजूला ठेवा. आता गॅसवर पॅन ठेवून त्यात थोडं तेल टाका. तेल गरम झालं की त्यात उभा चिरलेला कांदा टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. आता त्यात काजू टाकून थोडे परतून घ्या. थंड झालं की कांदा-काजू मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या.
आता पुन्हा पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात मॅरीनेट केलेलं ठेवून न परतता सर्व बाजूंनी नीट फ्राय करून घ्या. ज्या पद्धतीने आपण मासे फ्राय करतो अगदी तसंच.
आता कढई घ्या. गॅसवर ठेवा, गरम झाली की त्यात थोडं तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात लवंग, तमालपत्र, दालचिनी, आलं-लसूण पेस्ट टाकून 2 मिनिटं परतून घ्या. आता यात बारीक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅट पेस्टही टाकू शकतात. 2-3 मिनिटं परतल्यानंतर यात कांदा-काजूची पेस्ट टाकून परता. आता लाल तिखट मसाला, काश्मिरी मिरची मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, धनेपूड टाकून परतून घ्या. आता ज्या भांड्यात काजू-कांदा वाटला त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून भांड्याला लागलेलं वाटण पुसून हे पाणी या मिश्रणात ओता आणि झाकण लावून 5-6 मिनिटं शिजवून घ्या. आता ज्या भांड्यात चिकन मॅरीनेट केलं त्या भांड्यात पाणी टाकून या मिश्रणात ओता. फ्रेश क्रिम मिक्स करून 2-3 मिनिटं शिजवा, नंतर चिकन अॅड करा. झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्या.
चिकन मटणच्या रेसिपीचे हे व्हिडीओ युट्युब चॅनेलवरून घेण्यात आले आहेत. साहित्य आणि प्रमाण तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर समजेलच.
