निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून अनेकजण साखरयुक्त पेये टाळतात आणि स्पार्कलिंग वॉटर (sparkling water) किंवा सोडा वॉटर (soda water) हे पर्याय निवडतात. दिसायला दोन्ही सारखेच असले तरी, या दोन्हींमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे, जो अनेकदा दुर्लक्षित केला जातो. त्यांच्यातील नेमका फरक काय आहे, ते सविस्तरपणे समजून घेऊया.
स्पार्कलिंग वॉटर म्हणजे काय?
advertisement
स्पार्कलिंग वॉटर हा त्यातल्या त्यात नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे. हे पाणी नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड वायूने युक्त असू शकते किंवा त्यात ते मिसळले जाते. हे पाणी अनेकदा नैसर्गिक खनिज जल स्रोतांतून, उदा. डोंगरातील झरे यातून काढले जाते. या पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे महत्त्वाचे खनिज पदार्थ असतात. हेच या पाण्याला आरोग्यवर्धक बनवतात.
या पाण्याची चव हलकी खारट किंवा खनिजयुक्त असू शकते. यामध्ये साखर किंवा कोणताही फ्लेवर नसतो. जे लोक सॉफ्ट ड्रिंक्स सोडून हेल्दी आणि कॅलरीज नसलेले डिंक शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय असू शकतो. हे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. म्हणूनच वजन कमी करणाऱ्यांसाठीही हे फायदेशीर ठरू शकते.
सोडा वॉटर म्हणजे काय?
सोडा वॉटरला क्लब सोडादेखील म्हणतात. हे सामान्य फिल्टर केलेले किंवा नळाचे पाणी असते. मात्र यामध्ये कृत्रिमरित्या कार्बन डायऑक्साईड वायू मिसळून बुडबुडे तयार केले जातात. यात सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा, पोटॅशियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड यांसारखे खनिज पदार्थ कृत्रिमरित्या मिसळले जातात आणि यामुळे याची चव थोडी खारट लागू शकते.
सोडा वॉटर सामान्यतः तसेच प्यायले जात नाही. ते मॉकटेल, लिंबूपाणी किंवा इतर पेयांमध्ये घालून प्यायले जाते. खूप जेवल्यानतंर किंवा पोट फुगल्यावर काही लोक पचनास मदत म्हणून सोडा वॉटर पितात.
स्पार्कलिंग वॉटर आणि सोडा वॉटरमधील फरक...
या दोघांमध्ये सर्वात मोठा फरक त्यांच्या स्रोताचा असतो. त्याचबरोबर कार्बोनेशनच्या प्रक्रियेचा आणि चवीचा असतो. स्पार्कलिंग वॉटर बहुतेक नैसर्गिक खनिज स्रोतातून येते म्हणून ते हेल्दी मानले जाते. याउलट सोडा वॉटर पूर्णपणे कृत्रिम असते आणि बहुतेकवेळा इतर पेयांसोबत मिसळून पिण्यासाठी वापरले जाते. तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यासाठी गोड नसलेले पेय हवे असल्यास स्पार्कलिंग वॉटर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
याउलट जर तुम्हाला फक्त पेयांमध्ये 'fizz' हवा असेल किंवा कोणताही थकवा जाणवत असेल, तर तुम्ही सोडा वॉटर देखील पिऊ शकता. एकूणच, दोन्हींचा वापर वेगवेगळ्या उद्देशांसाठी होतो. पण जर तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल अवलंबू इच्छित असाल, तर तुमच्या शरीरासाठी कोणते पेय फायदेशीर आहे याबद्दल निश्चितच विचार करा. दोन्ही पेये साखरमुक्त असतात, त्यामुळे हे आरोग्यदृष्ट्या चांगले पर्याय मानले जातात. मात्र अती प्रमाणात सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. म्हणून हे मर्यादित प्रमाणातच प्यावे.
