गणेशोत्सवाचा आनंद यंदा कोकणात अधिक खुलून आला होता. पावसाच्या सरी, हिरवेगार डोंगर, डोलकाठीसह गावागावांत झालेल्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन-कीर्तनाच्या गजराने उत्सवाला एक वेगळेच रूप प्राप्त झाले. प्रत्येक वाड्यात, प्रत्येक गावात बाप्पांची सजलेली मंडपं आणि भाविकांचा उत्साह यामुळे कोकणभरात उत्सवी वातावरण होते. मात्र, उत्सव संपल्यानंतर आता चाकरमानी मुंबई-पुण्याकडे परतण्याच्या तयारीला लागले आहेत.
advertisement
सावंतवाडी स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी रेलचेल दिसत आहे. तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या असून अनेकांना गाड्यांचे नियमित तिकीट मिळाले नाही. त्यामुळे काहींना एजंटकडून दुप्पट-तिप्पट दराने तिकीट घ्यावे लागत आहे, तर काही प्रवाशांनी खासगी बस, रिक्षा किंवा इतर पर्यायी मार्ग स्वीकारले आहेत. आरक्षित आसनांची कमतरता असल्याने बऱ्याच प्रवाशांना डब्यात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. काहींना तर प्लॅटफॉर्मवर तासन्तास गाडीची प्रतीक्षा करताना त्रास सहन करावा लागतो आहे.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली आहेत. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वतीने अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेशन परिसरात अतिरिक्त कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. तरीही प्रवाशांच्या प्रचंड संख्येमुळे परिसर गजबजलेला दिसत आहे.
गर्दी, तिकीटांची कमतरता, लांबचा प्रवास अशा अडचणी असूनही चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. कारण मागील काही दिवस त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पासोबत, कुटुंबीयांसह आणि गावातील आप्तेष्टांसोबत घालवलेले आहेत. त्या आठवणी आणि आनंदच त्यांच्यासाठी खरी ऊर्जा ठरते. आता ते पुन्हा कामधंद्यासाठी शहरांकडे परतणार असले तरी त्यांच्या मनात पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आतुरता आधीच सुरू झाली आहे.