साडीच्या उदयाची नेमकी तारीख निश्चित करणं कठीण आहे. पण, तिची मूळं सिंधू संस्कृतीच्या काळात, म्हणजेच ईसवीसन पूर्व 2800 ते 1800 च्या काळातील प्राचीन भारतात शोधली जाऊ शकतात. सिंधू खोऱ्यातील उत्खननात आधुनिक साडीशी विलक्षण साम्य असलेल्या ड्रेप केलेल्या कापडाचं चित्रण करणारी शिल्पं आणि पुतळे मिळाले आहेत. त्यावेळच्या स्त्रियांनी शरीराभोवती गुंडाळलेली वस्त्रे बघून प्राचीन भारतीय कापड तंत्राच्या सुसंस्कृतपणावर प्रकाश टाकण्यास मदत होते.
advertisement
साडीचा इतिहास
भारताचा इतिहास जसजसा उलगडत गेला तसतशी साडीची उत्क्रांती झाली. वैदिक कालखंडात (1500-500 इसवीसन पूर्व) कपड्यांच्या शैलीत बदल घडवून आणले गेले. तेव्हा स्त्रिया न शिवलेले कापड परिधान करायच्या. 'साडी' हा शब्द संस्कृत शब्द 'सत्तिका' वरून आला आहे, असं मानलं जातं. शरीराभोवती बांधलेल्या कापडाच्या तुकड्याचा संदर्भ सत्तिकाला आहे. आज आपल्याला माहिती असलेल्या साडीची सुरुवात न शिवलेल्या स्वरूपात आणि अनेक पद्धतीनं ड्रेपिंग करण्याच्या वैशिष्ट्यांसह झालेली आहे.
शतकानुशतकं, मौर्य, गुप्त आणि मुघल यांसारख्या विविध राजवंश आणि साम्राज्यांनी साडीच्या डिझाईन, फॅब्रिक आणि ड्रेपिंग शैलीवर प्रभाव टाकून साडीच्या विकासात योगदान दिलं. विशेषत: मुघल कालखंडानं साडीच्या सौंदर्याला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. मुघलांनी क्लिष्ट भरतकाम, रेशीमासारखे उंची कापड, पर्शियन आणि भारतीय डिझाईन या घटकांचं मिश्रण साडीच्या माध्यमातून सादर केलं. मुघल काळात 'जरी' किंवा 'जारदोजी' काम म्हणून ओळखल्या जाणार्या प्रतिष्ठित शैलीला जन्म झाला. या काळात साडी केवळ समारंभात्मकच वस्त्रच नव्हे तर कलात्मक अभिव्यक्तीची कॅनव्हास बनली.
जसजसे व्यापार मार्ग विस्तारले आणि सांस्कृतिक संवाद वाढला तसतसा साडीचा प्रभाव सीमा ओलांडून गेला. साडीनं भारतातील विविध प्रदेशांमध्ये प्रवेश केला. प्रत्येक ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं साडीत बदल गेले केले. उदाहरणार्थ, गुजराती शैलीच्या साड्यांमध्ये भडक रंग आणि आरश्याचं वर्क दिसतं तर बंगाली साड्यांमध्ये समृद्ध सुत आणि सुशोभित काठ दिसतात.
साडीची उत्क्रांती
समाजातील स्त्रियांच्या बदलत्या भूमिकांना सामावून घेण्यासाठी साडी देखील विकसित झाली. वसाहतीच्या काळात जेव्हा भारतीय संस्कृतीवर ब्रिटिश प्रभाव पडला तेव्हा साडीकडे परंपरा आणि प्रतिकाराचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागलं. राणी लक्ष्मीबाई आणि सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचं प्रतीक म्हणून साडीचा वापर केला.
स्वातंत्र्योत्तर भारतात, आधुनिक स्त्रियांच्या बदलत्या जीवनशैली आणि प्राधान्यांशी जुळवून घेत साडी विकसित होत राहिली. डिझायनर्सनी फॅब्रिक्स, प्रिंट्स आणि ड्रेपिंग स्टाइल्सवर प्रयोग करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे क्लासिक कपड्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा जन्म झाला. साडीचं आकर्षण जागतिक रनवेवर प्रदर्शित केलं गेलं. साडीनं आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना मोहीत केलं आणि उत्कृष्ट सांस्कृतिक नमूना म्हणून तिचा दर्जा वाढवला.
सध्या साडी हा केवळ कपड्याचा तुकडा राहिलेला नाही. भारताचा समृद्ध वारसा, कारागिरी आणि विविधतेचा तो जिवंत पुरावा आहे. दक्षिण भारतातील शाही रेशमी साड्यांपासून ते उत्तरेकडील रंगीबेरंगी हातमागाच्या चमत्कारांपर्यंत, साडी तिच्या फॅब्रिकमध्ये विणलेल्या अनेक कथांचं प्रतिबिंब आहे. पारंपरिक ड्रेपिंग शैली टिकून राहिल्या असताना, समकालीन महिलांनी देखील जुन्या आणि नव्याचं मिश्रण स्वीकारले आहे. त्या विविध प्रसंगी साडीला ड्रेपिंग आणि स्टाइल करण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा प्रयोग करत आहेत.
प्राचीन सिंधू संस्कृतीपासून समकालीन अवतारांपर्यंतचा साडीचा प्रवास तिच्या चिरस्थायी आकर्षण आणि अनुकूलतेचा पुरावा आहे. साडीनं काळाच्या सीमा ओलांडून आधुनिकतेशी परंपरांचं मिश्रण केलं आहे. भारतीय संस्कृतीच्या साराचं ते प्रतीक आहे. प्रत्येक घडी आणि ड्रेपसह साडी ही उत्क्रांती, लवचिकता आणि कालातीत अभिजाततेची एक कथा विणतं. जी कथा जगभरातील लोकांना मोहीत करते.
