बनवण्याची पद्धत
दही घरात बनवले जाते. कोमट दुधात थोडे जावण (आधीचे दही) टाकून ते रात्रभर आंबवले जाते. दही बनवताना दुधामध्ये आधीपासून असलेले किंवा जावणातील नैसर्गिक बॅक्टेरिया वापरले जातात. योगर्ट मात्र व्यावसायिक पद्धतीने बनवले जाते. त्यासाठी दुधामध्ये काही विशिष्ट बॅक्टेरियाचे कल्चर टाकले जातात. तसेच योगर्ट बनवताना त्यातले पाणी गाळून घेऊन त्याच्यावर वजन ठेवून अन्यथा त्याला कपड्यात बांधून रात्रभर लटकवून ठेवले जाते.
advertisement
बॅक्टेरियाचा प्रकार
दह्यामध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक जीवाणू असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी बनवलेल्या दह्याची चव आणि पोत थोडी वेगळी असू शकते. योगर्टमध्ये मात्र विशिष्ट आणि नियंत्रित बॅक्टेरिया वापरले जातात, ज्यामुळे ते अधिक स्थिर आणि फायदेशीर असते. म्हणूनच, योगर्टला प्रोबायोटिक फूड म्हटले जाते.
चव आणि पोत
दह्याची चव थोडी आंबट असते आणि त्याचा पोत थोडा दाट असतो. योगर्टची चव अधिक गोड आणि स्मूथ असते, कारण त्यात अनेकदा साखर आणि फळांचे स्वाद मिसळलेले असतात.
पोषक तत्वे
दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, पण योगर्टमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असू शकते. योगर्टमधील प्रोबायोटिक्समुळे पचनक्रिया अधिक सुधारते.
उपलब्धता आणि उपयोग
दही हे भारतीय घरांमध्ये एक मुख्य खाद्यपदार्थ आहे, जे ताक, रायता, आणि कढीसाठी वापरले जाते. योगर्ट पाश्चात्त्य देशांमध्ये अधिक लोकप्रिय आहे आणि ते फळांसोबत किंवा स्मूदीमध्ये वापरले जाते.
फायदे आणि मर्यादा
दही पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. पण योगर्टमध्ये विशिष्ट जीवाणू असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावी मानले जाते.
दही आणि योगर्ट दोन्ही आरोग्यदायी आहेत, पण त्यांच्यातील फरक समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पदार्थाची निवड करू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)