‘दादांचे स्वप्न अपूर्ण राहिले’- शशिकांत शिंदे
साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे नमूद केले की, विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय आधीच ठरलेला होता. मात्र त्यांच्या निधनामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिले. “दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, पक्ष पुन्हा एकसंघ आणि मजबूत करण्यासाठी सर्वांनी मन मोठे करून प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राज्याच्या राजकारणात प्रभावी स्थान मिळवून देणं ही काळाची गरज आहे.
advertisement
चर्चांना पुन्हा उधाण
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. जरी शरद पवार यांनी सार्वजनिक व्यासपीठावर विलिनीकरणाच्या चर्चांपासून काहीसे अंतर ठेवले असले, तरी पडद्यामागे संवाद सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत होते. आता शशिकांत शिंदे यांच्या लेखामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील समीकरणे बदलली असून विलिनीकरणाच्या चर्चांना नव्याने चालना मिळाली आहे.
दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. त्यावर प्रत्युत्तर देताना दुसऱ्या गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना खुले आव्हान दिले. मात्र दादांच्या निधनानंतर संयम राखत असल्याचे सांगत रोहित पवारांनी आक्रमक भूमिका टाळली.
दरम्यान, आता शशिकांत शिंदे यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
