हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि उपनगरात पहाटेपासून पावसानं जोर धरला आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ मुंबई आणि आसपासचे जिल्हेच नव्हे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मागच्या तीन दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सलग पाऊस सुरू आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकांनी तातडीने किनाऱ्याकडे परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
