गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पुण्यातील गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. या प्रकरणात कुणीही जबाबदार असला तरी त्याला सोडणार नाही. मयताला न्याय देणं आमचं काम आहे, असं उपायुक्तांनी ठणकावून सांगितलं आहे. आता चुकीला माफी नाही, कोणताही गुन्हा करताना १०० वेळा विचार करा, असा इशाराही पिंगळे यांनी दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पिंगळे यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी पुण्यातून गुन्हेगारी संपवण्याचा थेट गेम प्लॅनच सांगितला आहे.
advertisement
पोलीस उपायुक्त नेमकं काय म्हणाले?
पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, "या सगळ्या प्रकरणाचा दोन तासांत उलगडा झाला आहे. मयताचं नाव आयुष गणेश कोमकर आहे. तो क्लासवरून घरी आल्यानंतर बेसमेटमध्ये त्याच्यावर दोन जणांनी फायरींग केली. आयुषचे वडील गणेश कोमकर हा मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकरच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. पोलीस प्रत्येक बाबींचा विचार करून चौकशी करत आहे. एकदम आततायीपणे निष्कर्षापर्यंत पोहोचणं योग्य नाही. या घटनेला जो जबाबदार असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही. प्राथमिकदृष्ट्या या प्रकरणात दोघांचा समावेश असल्याचं दिसून आलं आहे. मात्र यात आणखी लोक गुंतलेले असू शकतात, असा आम्हाला संशय आहे."
"मयत व्यक्तीला न्याय देणं आमचं काम आहे, आणि आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ. पोलीस आतापर्यंत चोखपणे आपलं काम पार पाडत आले आहेत. येथून पुढेही पार पाडू. हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा कुठल्याही चौकटीत कुणालाही माफ करण्यासारखा नाही. लोकांनी आम्हाला साथ द्यायची आहे. कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत. चुकीची माहिती पसरवायची नाही. आम्ही आमचं काम निश्चितपणे पार पाडणार, येथून मागेही आम्ही आमचं काम पार पाडलं आहे. आता चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करताना गुन्हेगारांनी १०० वेळा विचार करावा", असंही पोलीस उपायुक्त पिंगळे म्हणाले.