आरोपीने दहिसर, मुलुंड आणि नालासोपारा येथील महिलांशी संपर्क साधत स्वतःची ओळख पुण्यातील विराज भोसले अशी करून दिली. तसेच तो एका एनजीओचा अध्यक्ष असल्याचा दावा करत वडील आयपीएस अधिकारी असून सरकारी योजनांशी संबंध असल्याचे सांगून महिलांचा विश्वास संपादन केला.
वेगवेगळ्या महिलांकडून लाखालाखाच्या रकमा घेतल्या
महिलांना स्वस्त दरात घर मिळवून देतो असे सांगत आरोपीने सुरुवातीला टोकन रक्कम मागितली. घर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेकडून पैसे घेतले. पुण्यातील महिलेकडून 60 लाख रुपये, नालासोपारा येथील महिलेकडून 9.50 लाख रुपये, तर दहिसर येथील महिलेकडून 12 लाख रुपये, तर मुलुंड येथील महिलेकडून 18 लाख घेतले गेले. त्यानंतर आरोपीने वैयक्तिक कर्ज काढायला लावून आणखी रक्कम मिळवली आणि अखेरीस संपर्क टाळायचा.
advertisement
खरं नाव सांगणं टाळलं, महिलांना खोट्या नावाने भुलवलं
महिलेने पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने धमक्या दिल्या, शिवीगाळ केली तसेच राजकीय आणि पोलीस ओळखीचा धाक दाखवला, असा आरोप आहे. प्रकरणातील एका महिला तक्रारदराने आता समोर येत संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. महिलेकडून अनेकदा अनेक कारणांसाठी पैसे व Mac Book घेतला असून एकूण 12 लाखांची फसवणूक केली आहे. महत्वाचं म्हणजे तक्रारदारांनुसार विराज हे त्याचं खरं नाव नसून लोकांना लुबाडण्यासाठी तो हे नाव वापरत होता. या कटात त्याचं संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा ही आरोप तक्रारदराने केला.
मुंबई पुण्यात गुन्हे दाखल
सोशल मीडियावर तपास केल्यानंतर इतर महिलांचीही याच पद्धतीने फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून दहिसर, नालासोपारा, नवघर आणि पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यातही याच आरोपीविरोधात गुन्हे नोंद आहेत. आतापर्यंत चार महिलांनी विराज भोसलेविरोधात तक्रार दाखल केली असून सर्व प्रकरणांत एकच मोडस ऑपरेन्डी वापरण्यात आले आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
