श्यामसुंदर गुजर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलीस हवालदाराचं नाव आहे. तो स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होता. त्याच्यावर अहिल्यानगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पोलिसांनी जप्त केलेलं अल्प्रझोलम नावाचं अमली पदार्थ गायब केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने मूळ ड्रग्ज चोरून त्या पोत्यात मैद्याचं पीठ भरल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात १० किलो ९७५ ग्रॅम वजनाचं अल्प्रझोलम जप्त करण्यात आलं होतं. हा सगळा मुद्देमाल कक्षात जमा केला होता. या मुद्देमालाची देखरेख स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार शामसुंदर गुजर याच्याकडे होती. तपासात उघड झाल्यानुसार, गुजर याने मूळ अल्प्रझोलम काढून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केली. तसेच पुरावे लपवण्यासाठी त्या पोत्यात मैद्याचं पीठ भरून ठेवण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजर याला एका वेगळ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर हा काळाबाजार उघडकीस आला.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नेमलेल्या विशेष समितीने मुद्देमालाची पडताळणी केली असता ९ कोटी ९ लाख ७५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल समोर आला. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुजर याच्यावर फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गुजर याला सेवेतून तातडीने बडतर्फ केलं आहे.
