बाजीराव रखमाजी बाचकर असं आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचं नाव आहे. ते अंजनापूर इथं मागील तीन वर्षांपासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले असल्याचा आरोप केलाय.
advertisement
कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी बाजीराव यांना वेळोवेळी विविध कारणाने मानसिक आणि आर्थिक छळ केला. त्या जाचाला कंटाळून बाजीराव यांनी जीवन संपवले असून याबाबत बाचकर यांच्या मृत्यूनंतर एक सुसाइड नोट कुटुंबीयांना प्राप्त झाली आहे. ती सुसाईड नोट सध्या सोनई पोलिसांकडे असल्याची माहिती आहे. मात्र ती चिठ्ठी बाजीराव बाचकर यांचीच आहे का? याची खात्री सोनई पोलीस करत आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता. सदर ग्रामसेवक 17 जुलैपासून रजेवर होते आणि आठ ऑगस्टला त्यांनी विष घेतलं तर आम्ही त्यांचा छळ कसा केला? असे म्हणत त्यांना काय ताणतणाव आला माहीत नाही. मात्र कार्यालयाला कळवलं असतं तर त्यांच्या सहकाऱ्यांनी ताणतणाव दूर केला असता, असं म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.