तिसरं महायुद्ध सुरू? इराणच्या मदतीला 'हिजबुल्लाह' मैदानात; इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्र हल्ला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला, इस्रायलचा पलटवार, लेबनान हादरलं, तिसऱ्या महायुद्धाचे सावट गडद.
ज्या भीषण युद्धाची टांगती तलवार संपूर्ण जगावर होती, त्याचा भडका आता उडाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण पश्चिम आशिया (West Asia) आगीच्या विळख्यात सापडला आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या 'हिजबुल्लाह'ने थेट युद्धात उडी घेतली असून, सोमवारी रात्रीपासून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोन्सचा पाऊस पाडला आहे. या मोठ्या घडामोडीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट गडद झाले आहे.
खामेनेईंच्या रक्ताचा बदला घेणार!
लेबनानमधील इराण समर्थक उग्रवादी संघटना 'हिजबुल्लाह'ने अधिकृत निवेदन जारी करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. "अयातुल्ला अली खामेनेई यांच्या पवित्र रक्ताचा बदला घेण्यासाठी आणि इस्रायलच्या अत्याचाराला उत्तर देण्यासाठी आम्ही शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन्सनी इस्रायलला लक्ष्य केले आहे," असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षात पहिल्यांदाच हिजबुल्लाहने अशा प्रकारे मोठ्या हल्ल्याची उघड जबाबदारी स्वीकारली आहे.
advertisement
इस्रायलचा पलटवार: संपूर्ण लेबनान हादरलं!
हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर इस्रायलनेही रौद्र रूप धारण केले आहे. इस्रायली हवाई दलाने (IAF) तात्काळ कारवाई करत संपूर्ण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या तळांवर बॉम्बवर्षाव सुरू केला आहे. इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे की, "आमच्या नागरिकांवर होणारा प्रत्येक हल्ला आम्ही मोडून काढू. लेबनानमधून येणारी क्षेपणास्त्रे आम्ही हवेतच नष्ट केली असून, आता हिजबुल्लाहला पुन्हा उभं राहण्याची संधी देणार नाही."
advertisement
सीजफायरचा फज्जा; लेबनानमध्ये घबराट
नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम (Ceasefire) हिजबुल्लाहने या हल्ल्याद्वारे पूर्णपणे मोडीत काढला आहे. लेबनानचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. "आम्ही देशाला पुन्हा एकदा विनाशाच्या खाईत ढकलू देणार नाही," असे त्यांनी म्हटले असले तरी, हिजबुल्लाहच्या आक्रमकतेमुळे लेबनान सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे.
advertisement
जगाची धडधड वाढली!
एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणला लक्ष्य करत आहेत, तर दुसरीकडे हिजबुल्लाहने उघडलेली ही नवीन आघाडी युद्धाचा विस्तार करणारी ठरणार आहे. रशिया आणि चीन या परिस्थितीवर काय भूमिका घेतात, यावर आता जगाचे भवितव्य अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील पडझड पाहता, जगाने महायुद्धाच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:35 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
तिसरं महायुद्ध सुरू? इराणच्या मदतीला 'हिजबुल्लाह' मैदानात; इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्र हल्ला









